बलदंड प्रचितगडाचे कणखर अंग म्हणजेच बुरुज नवीन दृष्टिक्षेपात…!

संगमरत्न फाउंडेशन (एनजीओ), गडकरी परिवार आयोजित शनिवार रविवार दिनांक २२, २३ मार्च २०२५ रोजी किल्ले प्रचितगडावर ४० दुर्गप्रेमींसह श्रमदान मोहीम आणि दिशादर्शक फलक मोहीम आयोजित करण्यात आली होती.
    महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रारंभ केलेली ” प्रचितगड श्रमदान मोहीम ” यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून किल्ल्यांच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंत विविध संरक्षण उपाययोजना राबवण्यात आल्या. या मोहिमेत इतिहास संशोधक, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य, आणि स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरला आहे.
श्रमदान मोहिमे दरम्यान करण्यात आलेली कामे
‣ गावातून गडाकडे जाणाऱ्या वाटेवर दिशादर्शक फलक लावण्यात आहे..
‣ गडाचा मुख्य दरवाजा बाजूला असणारा बुरुज,त्यावरील वाढलेली झाडी झुडपे साफ कऱण्यात आली.
‣ गडावरील श्री भैरी भवानी मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.
‣ गडाचा मुख्य दरवाजा बाजूला असणाऱ्या पाण्याच्या टाकी मधील अस्वच्छ पाणी उपसा करण्यात आले.
‣ गडावरील वाटा झाडेझुडपे वेढलेल्या होत्या त्या मोकळ्या करण्यात आल्या.
   सह्याद्रीच रौद्रभीषण रुप अनुभवायच असेल तर प्रचितगड किल्ल्यावर एकदा तरी जायलाच पाहिजे.सदर मोहिमेला जाताना शृंगारपूर गावातून किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेचा वापर केला होता.किल्ल्यावर जाताना लागणार घनदाट जंगल, ७० ते ८० अंशात चढणारी दमछाक करणारी घसरडी पाउलवाट , अडचणीच्या जागी लावलेल्या शिड्या किल्ल्याची दुर्गमता अधोरेखित करतात.सदर मोहिमेत मुख्य काम पूर्ण गेले ते म्हणजे पूर्णतः मातीखाली गेलेला सुरेख असा बुरुज,
   खिंडी मधून शिडी वापर करून गडाकडे येताना कातळात कोरलेल्या १० ते १२ पायऱ्या चढल्यानंतर दरवाजाचे अवशेष दिसतात.दरवाजाची कमान अस्तित्वात दिसत नसली तरी कमान ज्या खांबांवर उभी होती ते खांब आहेत.दरवाजा मधून आपण गडामध्ये प्रवेश घेतो तेच समोर असणारे पाण्याचे टाके.आणि तिथूनच डाव्या बाजूला असणारा भक्कम बुरुज,अक्षरशः बुरुज देखणा आणि सुरेख पण त्यावरील दगड,माती मुळे पूर्णतः भरुन गेला होता.जवळ जवळ ७ ते ८ फूट खोल, आणि त्यावरील वाढलेली झाडझुडपे मुळे बुरुज कोंडलेला वाटत होता.पण थोडा का होईना पण आता बुरुज नव्या रूपात येत आहे.हे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता,अजून खूप काम तिथे बाकी आहे.
      या सोबतच गड मुख्य दरवाजा चढून वरती आल्यावर पाण्याचे टाके आहे.पण कित्येक वर्ष तसेच आहे.याच पाण्याच्या टाकी मधील अस्वच्छ पाण्याचा उपसा करण्यात आला आहे.
 रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील किल्ला,महाराणी येसूबाई याच्या शृंगारपूर गावाजवळून  ५४० मी. उंचीवर आहे.प्रचितगड या किल्ल्याचा उचितगड या नावाने अनेक ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आलेला दिसतो. सूर्यराव सुर्वे हे संगमेश्वर व शृंगारपूर या भागाचे आदिलशाहाचे सरदार होते. त्यांच्या अंमलाखाली शृंगारपूर व प्रचितगड होता. छ. शिवाजी महाराजांनी एप्रिल १६६१ मध्ये सूर्यराव सुर्वे यांच्यावर स्वारी करून प्रतिचगड जिंकून घेतला. छ. शिवाजी महाराजांनी प्रचितगड घेतल्याचे उल्लेख शिवभारत, जेधे शकावली व शिवचरित्र प्रदीप या ग्रंथांमधे येतात. परंतु सभासद बखरीमध्ये छ. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये प्रचितगडचे नाव येते. याचा अर्थ असा की, किल्ला महाराजांनी बांधला; परंतु काही काळ तो सुर्व्यांकडे होता व नंतर परत महाराजांनी तो घेतला. छ. संभाजी महाराजांच्या काळात प्रचितगड हा स्वराज्यातच होता, कारण छ. संभाजी महाराजांचा मुक्काम प्रचितगडच्या पायथ्याशी असलेल्या शृंगारपूरमध्ये अनेक वेळा झालेला होता. किल्ल्यांवरील वास्तू व इतर अवशेष पाहून किल्ला कधीच मोगलांकडे किंवा मुस्लिम सत्ताधीशांकडे गेला नसावा. मराठी साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल प्रॉथरने किल्ला जिंकून घेतला (१८१८). किल्ला जिंकल्यावर तो पाडल्याचे उल्लेख येतात; परंतु किल्ला न पाडता किल्ल्यावर जाणारे रस्ते सुरुंग लावून उडविण्यात आले.
 श्री प्रचितगड श्रमदान मोहीम साठी स्थानिक विद्यमान आमदार श्री शेखर गोविंदराव निकम सर यांसकडून मोलाचे मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य करण्यात आले.तसेच सरांकडून मोहीम श्रमदाते यांना रात्रीचे जेवण देण्यात आले. शृंगारपूर गाव स्थानिक श्री.मनेश मस्के साहेब यांसकडून नाश्ता व्यवस्था करण्यात आली होती. डॉ.र.दि.गार्डी माध्यमिक विद्यालय, कळंबस्ते वाडावेसराड शाळेचे शिक्षकवर्ग अजित जाधव सर,तांबे  यांसकडून गडावर संवर्धन कार्यासाठी लागणाऱ्या वस्तू ५ टिकाव,५ फावडे, आणि १० घमेले देण्यात आली.श्री मुकुंद सनगरे यांसकडून उन्हापासून वाचण्यासाठी ग्रीन नेट देण्यात आले.सदर मोहिमेला प्रसिद्ध यूट्यूबर ‘ कोकणकर अविनाश’  अविनाश घडशी उपस्थित होते.
मोहिमेच्या यशस्वीतेमुळे श्री प्रचितगड व इतर किल्ल्यांची संरचना टिकवून ठेवता येईल,आणि त्यांचा पर्यावरणीय व सांस्कृतिक वारसा जपला जाऊ शकतो. या यशासाठी सर्व सहभागी लोकांचे आम्ही धन्यवाद देत आहोत, ज्यांनी आपल्या अथक मेहनतीने या मोहिमेला यश प्राप्त करून दिले त्यांचे ‘ संगमरत्न फाऊंडेशन ‘ आणि ‘ गडकरी परिवार ‘ कडून आभार व्यक्त केले आहेत.रत्नागिरी जिल्हामध्ये तसेच शिवप्रेमींच्या कडून मोहिमेची चर्चा आणि मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल अभिमान व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा