भारतातील सर्वांत आनंदी राज्य कोणतं? – हॅपीनेस इंडेक्सवर आधारित एक विश्लेषण

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. या देशात भाषा, धर्म, संस्कृती, रहाणीमान आणि भौगोलिक विविधता प्रचंड प्रमाणात आढळते. अशा देशात नागरिकांचा ‘आनंद’ किंवा ‘हॅपीनेस’ मोजणे हे खूपच गुंतागुंतीचं काम असतं. मात्र, ‘हॅपीप्लस कन्सल्टिंग’ या संस्थेने नुकत्याच जाहीर केलेल्या ‘इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट’मधून भारतातील सर्वांत आनंदी राज्यांची यादी समोर आली आहे. या यादीतील राज्यांचे आनंदाचे निकष काय आहेत, आणि सर्वांत आनंदी व कमी आनंदी राज्य कोणते आहेत, यावर एक सविस्तर नजर टाकूया.
भारतभर विविध प्रकारच्या हवामानात आणि भौगोलिक परिस्थितीत लोक राहत असले तरीही, त्यांच्या आनंदी जीवनमानाचे कारण केवळ निसर्गसौंदर्य नसते. सामाजिक स्थैर्य, आर्थिक स्थिरता, आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा, सांस्कृतिक मूल्ये, नोकरीच्या संधी आणि कौटुंबिक सहकार्य या सर्व बाबी देखील आनंदी जीवनासाठी महत्त्वाच्या ठरतात.
सर्वेक्षणाचे निकष:
‘इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट’मध्ये लोकांच्या आनंदाचे मोजमाप करण्यासाठी जीवनातील समाधान, भावनिक स्वातंत्र्य,
समर्थन करणारा सामाजिक गट, निवडीचे स्वातंत्र्य, उदारता,
पर्यावरणीय गुणवत्ता, अणि
प्रशासनातील पारदर्शकता या निकषांच्या आधार घेतला आहे.
भारतातील सर्वांत आनंदी राज्य – हिमाचल प्रदेश:
ह्या यादीत हिमाचल प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं हे राज्य नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहे. इथले लोक शांत, सहृदयी आणि समृद्ध सामाजिक संबंध जोपासणारे आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहणं, कमी प्रदूषण, चांगली आरोग्यसेवा, पर्यटन व्यवसायातून मिळणारा रोजगार आणि सुसंस्कृत सामाजिक व्यवहार यामुळे हिमाचल प्रदेशात राहणारे लोक अधिक आनंदी आहेत.
टॉप 10 आनंदी राज्यांची यादी
1. हिमाचल प्रदेश – नैसर्गिक सौंदर्य, सामाजिक सौहार्द
2. मिझोरम – कमी गुन्हेगारी, मजबूत समाजव्यवस्था
3. अंदमान आणि निकोबार बेटे – शांतता, पर्यटन
4. पंजाब – समृद्ध शेती, सामाजिक नातेसंबंध
5. गुजरात – औद्योगिक प्रगती, आर्थिक स्थिती
6. सिक्कीम – स्वच्छता, पर्यावरणपूरक जीवनशैली
7. पुद्दुचेरी – फ्रेंच वारसा, आध्यात्मिक शांतता
8. अरुणाचल प्रदेश – जैवविविधता, शांत जीवन
9. केरळ – उच्च साक्षरता, उत्कृष्ट आरोग्यसेवा
10. मेघालय – निसर्गरम्य जीवन, मातृसत्ताक समाज
या यादीत काही आश्चर्यकारक गोष्टी देखील दिसतात. उदाहरणार्थ, अंदमान आणि निकोबार सारखी बेटं, जिथे खंडप्राय देशाच्या मुख्य प्रवाहापासून तुटलेली वस्ती आहे, ती देखील तिसऱ्या क्रमांकावर आनंदी आहे. यामागे निसर्ग, शांततेने भरलेलं जीवन आणि कमी सामाजिक दडपण ही मुख्य कारणं आहेत.
सर्वांत कमी आनंदी राज्य – उत्तर प्रदेश:
दुर्दैवाने, ह्याच अहवालात उत्तर प्रदेश हे सर्वांत कमी आनंदी राज्य ठरलं आहे. इथल्या नागरिकांना अनेक सामाजिक व आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, सामाजिक असुरक्षितता, भ्रष्टाचार, आणि शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील दुर्लक्ष यामुळे इथल्या लोकांच्या जीवनात समाधानाचा अभाव आहे. सरकारकडून अनेक योजना असल्या तरी त्यांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने न झाल्याने सामान्य नागरिकांचं जीवनमान उंचावलेलं नाही.
आनंदाच्या मार्गावर भारत:
भारत सरकारने ‘इज ऑफ लिव्हिंग’, ‘स्वच्छ भारत मिशन’, ‘स्मार्ट सिटी’ अशा योजनांद्वारे नागरिकांचे जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शहरे आणि राज्यांमध्ये सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसते. परंतु अद्याप खूप राज्यांमध्ये आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, रोजगार, आणि स्त्रियांच्या सुरक्षेसारख्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे.
एकुणच, ‘हॅपीनेस इंडेक्स’ हे केवळ एक आकड्यांमधील तक्ताच नाही, तर तो राज्यांच्या धोरणांची आणि नागरिकांच्या जीवनशैलीची एक आरसासुद्धा आहे. नागरिक आनंदी असतील, तरच ते उत्पादक ठरतील, समाज प्रगत होईल आणि राष्ट्र समृद्ध होईल. यासाठी प्रत्येक राज्याने केवळ GDP नव्हे, तर GHP – Gross Happiness Product याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
या सर्वेक्षणातून आपण हे शिकू शकतो की आर्थिक प्रगतीच्या जोडीला सामाजिक सौहार्द, पर्यावरण जपणं आणि चांगली प्रशासन व्यवस्था हेसुद्धा आनंदाच्या मूलभूत गोष्टी आहेत.
संदर्भ: हॅपीप्लस कन्सल्टिंग – इंडियन हॅपीनेस इंडेक्स रिपोर्ट 2025
स्रोत: TV9 मराठी (13 एप्रिल 2025)
– डॉ भारत कऱ्हाड (प्राचार्य, वराडकर महाविद्यालय दापोली, जिल्हा रत्नागिरी)

आणखी वाचा