‘टोपी’तून टोला! – अंबादास दानवेंनी बावनकुळेंना घातली ‘मी मराठी’ टोपी, विरोधकांची घोषणाबाजीने विधानभवन दणाणले

“हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द झाल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी ‘मी मराठी… अभिमान मराठीचा’ असे फलक झळकवत विधानभवनाच्या पायरांवर मराठीच्या समर्थनार्थ आंदोलन केले.”
(छायाचित्र : अनिल फाळके, विधानभवन, मुंबई)
मुंबई, दि. ३० (क्षितिज कदम): राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाबाहेर राजकीय तापमान चांगलंच वाढले. ‘मी मराठी’ असा ठसा असलेल्या टोपीमुळे वातावरण गरम झालं आणि विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये प्रत्यक्ष ‘टोपी घालणे’ हेच आंदोलनाचं प्रमुख हत्यार ठरलं.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर सकाळपासूनच विरोधी पक्षांचे आमदार विविध मुद्द्यांवर सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करत होते. यावेळी सर्व विरोधी आमदारांनी पांढऱ्या रंगाची “मी मराठी” छापलेली टोपी परिधान केली होती. या आंदोलनाचं वैशिष्ट्य ठरलं ते अंबादास दानवे यांचं सरळसरळ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेलं टोपी आंदोलन.
ज्यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे विधानभवनाच्या दिशेने येत होते, त्याचवेळी विरोधकांनी “टोपी घाला! टोपी घाला!” असा जयघोष सुरू केला. बावनकुळे यांना टोपी घालण्याची इच्छा नव्हती, मात्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी थेट त्यांच्या डोक्यावर ‘मी मराठी’ टोपी ठेवली. क्षणभर बावनकुळे हसून घेतल्यासारखे वाटले, पण काही वेळातच त्यांनी ती टोपी काढून टाकली.
यानंतर परिसरात “जय भवानी, जय शिवाजी”, “मराठी माणसाच्या अभिमानाचा विजय असो”, “सरकार हाय हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विरोधकांनी या अनोख्या प्रकारातून सरकारला अप्रत्यक्ष टोला लगावल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, विधानसभेत पहिल्या दिवशी केवळ 26 मिनिटांचं कामकाज झालं. शोक प्रस्ताव आणि चार अध्यादेश मांडण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ₹57,509 कोटी 71 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहात सादर केल्या.
या अधिवेशनात मराठी भाषा, शेतकरी प्रश्न, महागाई, वीज दरवाढ, महिला सुरक्षेचे प्रश्न आदींवर विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणार आहेत. पहिल्याच दिवशी सरकारविरोधी घोषणाबाजी आणि प्रत्यक्ष टोपी घालण्याच्या घटनेने अधिवेशनाचा सुरुवातीपासूनच गाजावाजा झालेला आहे.
राज्याच्या राजकारणात मराठी अस्मिता, भाषिक अभिमान आणि प्रतीकात्मक आंदोलनं यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. त्यामुळेच विरोधकांनी ‘टोपी’ हा राजकीय संवादाचा माध्यम म्हणून वापरून लक्ष वेधलं, हे निश्चित.

आणखी वाचा