परवानगी नाकारली तरी ६ एप्रिलला लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनी विरोधात महामोर्चा; आंदोलकांचा निर्धार कायम

खेड(लोटे), दि. ०३ : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीत प्रस्तावित PFAS (पर- आणि पॉलिफ्लुओरोअल्काईल पदार्थ) उत्पादनाविरोधात स्थानिक नागरिकांचा विरोध अधिक तीव्र झाला असून, ६ एप्रिल रोजी कंपनीसमोर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यावरण व आरोग्याच्या धोक्याचा मुद्दा पुढे करत ग्रामस्थांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शवला आहे.

कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. मागील सुमारे ७२ दिवसांपासून ग्रामस्थांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवले असून, आता हा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे.

PFAS हे रसायन “फॉरेव्हर केमिकल्स” म्हणून ओळखले जाते. हे पदार्थ वातावरणात आणि मानवी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. यामुळे पाणी, माती आणि अन्नसाखळी दूषित होण्याचा धोका असून, कर्करोग, हार्मोनल बिघाड तसेच यकृत व थायरॉईडसंबंधी आजारांचा संभव व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लोटे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, कंपनीकडून इटलीतील ‘मिटेनी’ या वादग्रस्त कंपनीची यंत्रसामग्री वापरली जात असल्याचा आरोप पर्यावरणवादी संघटनांनी केला आहे. याच कारणामुळे स्थानिकांचा संशय अधिक वाढला असून, कोकणासारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागात अशा धोकादायक उद्योगांना परवानगी देऊ नये, अशी भूमिका घेतली जात आहे.

या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी काही ठराविक मागण्या मांडल्या आहेत.
PFAS उत्पादन तात्काळ बंद करावे
प्रदूषणाची स्वतंत्र व सखोल चौकशी करावी
दूषित पाणी, माती व आरोग्यावर परिणामांचा वैज्ञानिक अहवाल जाहीर करावा
संबंधितांवर कठोर कारवाई करावी
स्थानिकांना स्वच्छ पाणी व आरोग्य सुरक्षा द्यावी
तातडीने जनसुनावणी घेण्यात यावी

श्री. अशोकराव जाधव आणि श्री. राजू आंब्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून, “उद्योग हवा पण आरोग्याच्या किंमतीवर नको” अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. ६ एप्रिलच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या मोर्च्याला अद्याप परवानगी नाकारली असून, यामुळे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारनेही या प्रकरणी सावध भूमिका घेतली असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी वाचा