संगीत क्षेत्रातील जादुई स्वर हरपला! दिग्गज गायिका आशा भोसले यांचे निधन

मुंबई, दि. 12 — भारतीय संगीतसृष्टीतील सुवर्णपान ठरलेल्या, आपल्या बहुआयामी आणि जादुई आवाजाने सात दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे आज (12 एप्रिल) निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे संगीत विश्वावर शोककळा पसरली असून एका युगाचा अस्त झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

शनिवारी (11 एप्रिल) सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली जात असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यानंतर अवयव निकामी (ऑर्गन फेल्युअर) झाल्याने त्यांचे निधन झाले.

आशा भोसले यांच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलगा आनंद भोसले यांनी दिली. “माझी आई आपल्यात राहिली नाही. उद्या सकाळी 11 वाजल्यापासून लोअर परळ येथील निवासस्थानी पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क येथे अंतिम संस्कार करण्यात येतील,” अशी माहिती त्यांनी दिली.

संगीतविश्वातील ‘सुरांची मलिका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशाताईंनी गेली सात दशके आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडसह संपूर्ण भारतीय संगीत क्षेत्राला मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आवाजातील ऊर्जा, विविधता आणि भावपूर्णता यामुळे त्यांनी प्रत्येक पिढीच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं.

1933 साली जन्मलेल्या आशा भोसले यांनी 1948 साली ‘चुनरिया’ चित्रपटातील ‘सावन आया’ या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू, मल्याळम यांसह अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. एकूण सुमारे 16 हजारांहून अधिक गाणी गात त्यांनी विक्रम प्रस्थापित केला.

‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘ये मेरा दिल’, ‘चुरा लिया है तुमने’, ‘राधा कैसे ना जले’, ‘दिल चीज क्या है’ यांसारख्या असंख्य गाण्यांनी त्यांनी संगीतप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. शास्त्रीय, गझल, पॉप, कॅबरे, लोकसंगीत अशा विविध शैलींमध्ये त्यांनी सहज वावर करत आपल्या आवाजाची बहुपयोगिता सिद्ध केली.

आशा भोसले यांना ‘पद्मविभूषण’सह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना ‘क्वीन ऑफ इंडिपॉप’ अशीही उपाधी मिळाली होती. त्यांच्या आवाजाने भारतीय संगीताला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली.

त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच देशभरातून शोकसंदेशांचा वर्षाव सुरू झाला आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह कलाकारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. सोशल मीडियावर चाहत्यांनीही भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करत “एक युग संपलं” अशा भावना व्यक्त केल्या.

उद्या लोअर परळ येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर शिवाजी पार्क येथे शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार होणार आहेत.

आशा भोसले यांच्या जाण्याने केवळ एक महान गायिका नव्हे, तर भारतीय संगीताचा एक अमूल्य ठेवा हरपला आहे. त्यांच्या आवाजातील जादू, त्यांनी दिलेली गाणी आणि त्यांच्या आठवणी कायमच रसिकांच्या मनात जिवंत राहतील.

आणखी वाचा