चिपळूण, दि. १८ (अनिल फाळके): रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तळवडे गावात इंटरनेट सेवेसाठी ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीनं आवाज उठवला आहे. गावात अजूनही मोबाईल नेटवर्कची सुविधा नसल्यामुळे नागरिकांना शिक्षण, आरोग्य, बँकिंग, शासकीय सेवा अशा दैनंदिन व्यवहारांत मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. डिजिटल युगातल्या या मूलभूत सुविधेअभावी गावकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर गावात एका अज्ञात व्यक्तीने लावलेला बॅनर सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. बॅनरवरील ठळक मजकूर —
“पुढाऱ्यांनी फुकट गावात फिरू नये… आमच्या भावना समजून घ्या… नेट घा, मत घा!”
या संदेशानेच ग्रामस्थांची नाराजी आणि मागणी दोन्ही स्पष्टपणे मांडली आहेत. याखाली “तळवडे गाव म्हणतंय – आता गावात इंटरनेट कनेक्शन पाहिजेच!” असा थेट इशाराही देण्यात आला आहे.
सध्या निवडणुकीचा माहोल असून अनेक राजकीय नेते गावोगावी प्रचारासाठी फिरत आहेत. मात्र तळवडेकरांनी यावेळी ‘काम नसेल तर मत नाही’ अशी ठाम भूमिका घेतल्याचे बॅनरवरून दिसून येत आहे.
गावातील तरुण, विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार आणि विशेषतः महिला यांना इंटरनेट नसल्यामुळे दररोज अनेक समस्या भोगाव्या लागतात. ऑनलाईन शिक्षण, शासकीय योजना, बँकिंग सेवा, कागदपत्रे सादर करणे, रोजगाराच्या संधी, आरोग्यविषयक माहिती — सर्व काही इंटरनेटवर अवलंबून असताना तळवडे गाव आजही डिजिटल अंधारात आहे.
हा बॅनर नेमका कोणी लावला याबाबत अद्याप स्पष्टता नाही. परंतु गावकऱ्यांमध्ये यावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी याला ग्रामस्थांच्या हक्कांसाठीचा योग्य संदेश म्हटले आहे, तर काहींनी हीच योग्य वेळ आणि योग्य पद्धत असल्याचे मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, या बॅनरमुळे स्थानिक प्रशासन आणि राजकीय प्रतिनिधी यांच्यावरही तातडीने इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याचा दबाव निर्माण झाला आहे. तळवडेकरांनी दिलेला हा संदेश आगामी निवडणुकीत किती प्रभाव टाकतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.








