बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा; विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह नूतनीकरण व तारांगणाचे भूमिपूजन; ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’चा संकल्प

बीड, दि. १७ सप्टेंबर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधत बीडकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या बीड-पुणे थेट रेल्वेसेवेला उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी रेल्वे क्रमांक ‘झिरो वन फोर झिरो वन’ प्रस्थानासाठी सज्ज असल्याची उद्घोषणा परिसरात घुमली.

या सोहळ्यासोबतच बीडच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासाला चालना देणाऱ्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे तसेच धानोरा रस्त्यावरील ‘पंढरी’ येथे उभारण्यात येणाऱ्या विज्ञान उद्यान व तारांगण प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, आमदार विजयसिंह पंडित, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत आदी उपस्थित होते.

बीड जिल्हा अनेक दशकांपासून रेल्वेच्या मुख्य नकाशापासून दूर होता. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि नोकरदारांना प्रवासासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता. बीड-अहिल्यानगर रेल्वेसेवेच्या प्रारंभावेळी दिवंगत अजित पवार यांनी बीडकरांना पुण्यापर्यंत रेल्वेसेवेचे आश्वासन दिले होते. आज ते आश्वासन पूर्ण झाल्याचे सांगताना सुनेत्रा पवार यांनी समाधान व्यक्त केले. येत्या काही महिन्यांत बीड-पनवेल थेट रेल्वेसेवा सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. बीड-परळी रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर बीड थेट दक्षिण भारताशी जोडला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी ८ कोटी १९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जुन्या वास्तूचे जतन करत अत्याधुनिक ध्वनी व प्रकाश व्यवस्था, वातानुकूलन, आरामदायी आसनव्यवस्था आणि आधुनिक रंगमंचामागील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. धानोरा रस्त्यावरील ‘पंढरी’ येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्चाचा विज्ञान उद्यान व तारांगण प्रकल्प उभारण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यासाठी १४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून कृत्रिम बुद्धिमत्ता, आभासी तंत्रज्ञान आणि खगोलशास्त्राची माहिती मिळणार आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात सुनेत्रा पवार यांनी हुतात्मा स्मारकाला भेट देऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. स्वातंत्र्यसैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. बीड आणि अंबाजोगाईच्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण करून या भूमीचा चेहरामोहरा बदलून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

यावेळी परळी वैजनाथ तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ३०१ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता, पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी झालेली मोठी गुंतवणूक, क्रीडा संकुलासाठी २५ कोटी रुपयांचा निधी तसेच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे बीडमध्ये आयोजन याबाबतही माहिती देण्यात आली.

शेती व सिंचन क्षेत्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सुमारे ६७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४९१ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगण्यात आले. आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे २६ गावांतील ८ हजार १४७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. रोजगार, आरोग्य, सामाजिक न्याय आणि विविध कल्याणकारी योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. विभागीय रेल्वे प्रबंधक राजेशकुमार वर्मा आणि खासदार बजरंग सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. भारतीय रेल्वेच्या महाराष्ट्राच्या विकासातील योगदान या विषयावरील निबंध व चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपात मराठवाडा मुक्तिसंग्रामातील ज्ञात-अज्ञात हुतात्मे आणि स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यात आली. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली.

आणखी वाचा