सेवा संकल्प अभियान : ग्रामस्वच्छतेवरच गावाचे आणि मुलांचे भविष्य अवलंबून; जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे ग्रामपंचायतींना महत्त्वाचे आवाहन

रत्नागिरी, दि. 17 (जिमाका) : गावाचा विकास केवळ सुंदर आणि मोठ्या इमारतींनी होत नसून, गावातील लोकांचे आरोग्य आणि मुलांचे उज्ज्वल भविष्य हे संपूर्णपणे स्वच्छतेवर अवलंबून असते, असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले. सेवा संकल्प अभियानांतर्गत मिरजोळे समूह ग्रामपंचायतीमध्ये वृक्षारोपण केले. यावेळी आपले सरकार केंद्राला भेट देऊन त्यांनी कौतुक केले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पंचायत समिती सभापती प्रविण पांचाळ, सरपंच रत्नदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा गावडे, पंचायत समिती सदस्य वैभव पाटील, उपसरपंच राहुल पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर आदी उपस्थित होते.

सेवा केंद्रातून नागरिकांना मिळणारे दाखले, मुलांच्या शाळा प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांचे वितरण तसेच नोंदवह्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बारकाईने पाहणी केली. कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करतानाच त्यांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावर विशेष भर दिला.

उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल म्हणाले, गावांमध्ये निर्माण होणारा कचरा, प्लास्टिक, कीटकनाशके आणि अस्वच्छता थेट आपल्या अन्नात आणि पाण्यात मिसळत असतात. आज गावागावांत कॅन्सर आणि इतर गंभीर आजारांचे प्रमाण वाढत असून, त्याचे मुख्य कारण अस्वच्छता आणि प्रदूषण आहे. निधी आणि संसाधनांची मर्यादा असली तरी उपलब्ध साधनांमध्ये योग्य नियोजन करून नागरिकांना कचरा व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणे काळाची गरज आहे.

ज्या भागात एमआयडीसी क्षेत्र किंवा वाढते नागरीकरण आहे, तेथे कचऱ्याची आणि सांडपाण्याची समस्या अधिक गंभीर बनते. यासाठी घंटागाडीचे योग्य व्यवस्थापन आणि कचरा विलगीकरण प्रभावीपणे राबवले पाहिजे. गावातील आरोग्याचा प्रश्न हा स्वच्छतेशी जोडलेला असल्याने पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनी यामध्ये पुढाकार घेऊन नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करावे, असे आवाहन त्यांनी केले.

मिरजोळे ग्रामपंचायतीची सुंदर इमारत, स्वच्छता, आपले सरकार केंद्राचे कामकाज, नीटनेटकेपणा याविषयी जिल्हाधिकारी श्री. जिंदल हे प्रसन्न झाले. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे विशेष कौतुक केले.

आणखी वाचा