रत्नागिरी दि. 17 (जिमाका) : पंतप्रधान पदाच्या २५ वर्षे पूर्तीनिमित्त जिल्ह्यात आजपासून १७ ऑक्टोबर पर्यंत एक महिन्याच्या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाची सुरुवात पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यविषयक उपक्रमांनी करण्यात आली आहे. विविध समाज उपयोगी उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने कुवारबाव उत्कर्ष नगर वडार समाज सेवा गणेशोत्सव मंडळ येथे ‘लोकसंवाद 2026’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी जिल्हाधिकारी श्रीमती रानडे यांनी सेवा संकल्प अभियानाची सविस्तर माहिती दिली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल उपस्थित होते. या अभियानांतर्गत जिल्हाभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत, त्याबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी दिली.
त्या म्हणाल्या, अभियानाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून एनसीडी स्क्रीनिंग, कर्करोग तपासणी आणि भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. महिनाभरात शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये आनंददायी ‘अंगणवाडी उत्सव’ साजरा केला जाईल. तसेच ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेवर आधारित वक्तृत्व, चित्रकला व विविध स्पर्धांचे आयोजन होणार आहे.
व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरता यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर जिल्ह्यात विशेष जनजागृती सत्रे आणि सेवा पुरवल्या जातील. जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, ग्राम प्रशासन आणि सर्व लाईन डिपार्टमेंट्स एकत्रित येऊन हा ‘सेवादानाचा महायज्ञ’ यशस्वी करणार आहेत. ज्या नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे, त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.
या महिनाभराच्या सेवा संकल्प अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील आणि गटविकास अधिकारी उमेश गावधडकर, मंडळाचे अध्यक्ष सुनील वडार, उपाध्यक्ष विलास माने, खजिनदार सागर वाघ यांच्यासह नागरिक उपस्थित होते.







