रत्नागिरीत मोफत रुग्णसेवेचा नवा अध्याय – भगवान सांबरे रुग्णालयाचे उद्घाटन

रत्नागिरी, दि. ०१ : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र संचालित श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचे उद्घाटन आज रत्नागिरी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व पालकमंत्री, उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य स्वरूपात पार पडले.
या रुग्णालयाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणार आहे. “माझ्या मतदारसंघात हे हॉस्पिटल उभारल्याबद्दल मा. निलेश सांभारे यांचे मनःपूर्वक आभार,” असे उद्गार मा. ना. उदयजी सामंत यांनी काढले. तसेच, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्यामुळेच राज्यातील पहिले वातानुकूलित वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीत ५०० कोटींच्या निधीसह उभे राहिले. त्यांच्या तत्पर निर्णयांमुळे ७२ हजार रुग्णांचे प्राण वाचवले गेले – हेच त्यांच्या रुग्णांप्रती असलेल्या सेवाभावाचे उदाहरण आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या लोकार्पण सोहळ्याला मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे सुद्धा उपस्थित होते. त्यांनी जिजाऊ संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक करताना म्हटले की, “निलेशजी सांबरे यांच्या नेतृत्वाखाली जिजाऊ संस्थेने कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य केले आहे. दिवसाचे २४ तास, वर्षाचे ३६५ दिवस ते गोरगरीबांसाठी झटत आहेत. रत्नागिरीत उभे राहिलेले हे मोफत रुग्णालय म्हणजे त्यांच्या सेवाभावाचे मूर्त रूप आहे.”
ते पुढे म्हणाले, “या संस्थेचे काम समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले आहे. निलेशजी सांबरे यांना आम्ही शुभेच्छा देतोच, पण त्यांच्या कामात कुठेही अडथळा आला तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. तसेच, भारतीय जनता पक्षात त्यांना योग्य सन्मान मिळेल, याची खात्री आम्ही देतो.”
कार्यक्रमास राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण भैय्या सामंत, माजी आमदार राजन साळवी, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे, तसेच हजारोंच्या संख्येने नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी वाचा