नायरी गावच्या तरुणावर कोयत्याने सपासप वार; उपचारादरम्यान मृत्यू

रत्नागिरी कुवारबाव येथील घटना खूनप्रकरणी ३ संशयित ताब्यात; शहर पोलिसांचा तपास सुरू

रत्नागिरी, दि. २२ : शहरानजीकच्या कुवारबाव येथील साईनगर परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या थरारक हल्ल्यात एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सूरज राजाराम झोरे (वय २५, मूळ रा. नायरी, ता. संगमेश्वर, सध्या रा. विरार, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले होते. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ही घटना गुरुवारी (दि. २१ मे) रात्री ९.३० ते १०.५३ वाजण्याच्या दरम्यान साईनगर येथील सात बंगल्यांच्या मागील परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात कारणावरून झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी सोहम एकनाथ म्हात्रे, अभिषेक देवानंद राठोड आणि नजीबूल शेख उर्फ सोनू (तिघांचेही पूर्ण पत्ते अद्याप समजू शकले नाहीत) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत सूरज झोरे याची बहीण नंदा रमेश फाले (रा. दहिसर, मुंबई) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, सूरज काही कामानिमित्त रत्नागिरीत आला होता. दरम्यान, गुरुवारी रात्री संशयित तिघांनी मिळून त्याच्यावर कोयत्याने मानेवर व हातांवर वार करत गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. स्थानिकांच्या मदतीने सूरजला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

घटनेनंतर शहर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवत संशयितांना ताब्यात घेतले असून, हल्ल्यामागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे करत आहेत.

आणखी वाचा