Chiplun Hit and Run Case : चिपळुणातील मोठ्या नेत्याच्या मुलाने पादचाऱ्याला उडवले, प्रौढाचा जागीच मृत्यू

चिपळूण, दि. ६ (प्रतिनिधी): चिपळुणात मेट्रो शहरांना लाजवेल असा हिट अँड रन अपघात घडला असून, एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना चिपळूण तालुक्यातील काविळतली येथे सोमवारी (५ ऑगस्ट) रात्री उशिरा घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, पोलिसांच्या भूमिकेवर देखील गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याच्या ,मुलाने भरधाव इनोव्हा क्रिस्टा वाहन चालवताना ५० वर्षीय रमेश कळकुट्टी या पादचाऱ्याला जोरात धडक दिली. या धडकेने कळकुट्टी हे अक्षरशः हवेत उडाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. धडक देताच चालक घटनास्थळावर थांबण्याऐवजी पळून गेला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही काळ रस्ता रोखून धरत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “नेत्याच्या मुलांना कायद्याचा भीती राहिलेली नाही का?”, असा संतप्त सवाल नागरिकांनी यावेळी उपस्थित केला.
या दुर्घटनेनंतर पोलिसांकडून त्वरित कारवाई न झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अपघात घडल्यानंतर तब्बल काही तास उलटून गेले तरी गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान, पोलीस ठाण्यात स्थानिक राजकीय नेत्यांची
गर्दी जमल्याचे दृश्य होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ‘सूचना’ आणि ‘फोनफोनी’नंतरच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे.
ही घटना केवळ एका पादचाऱ्याच्या मृत्यूची नसून, ती कोकणातील वाढत्या बेदरकार व बिनधास्त वाहनचालकांच्या प्रवृत्तीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. कायद्याची भीती आणि मानवतेचा विचार बाजूला ठेवून ‘राजकीय बळावर’ गाड्या चालवणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालण्याची मागणी यानिमित्ताने पुन्हा जोर धरू लागली आहे.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली असली, तरी आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा व्हावी, अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे.

आणखी वाचा