चिपळूण, दि. ५ : “ज्या पद्धतीने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था कार्यरत आहे, त्याचा अभिमान सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटला पाहिजे. संपूर्ण तळकोकणात इतकी सुंदर वास्तू आणि आदर्श व्यवस्थापन पाहायला मिळणं दुर्मीळ आहे,” अशा शब्दांत महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सहकार भवनाचे आणि संस्थेच्या उपक्रमांचे कौतुक केले.
केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापना सप्ताहानिमित्त चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने शनिवारी सहकार भवन येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी संस्था स्थापनेपासून चालविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांचे विशेष उल्लेख करून त्याला ‘आदर्श कार्यपद्धती’ असे संबोधले.
ना. सामंत म्हणाले, “पालकमंत्री म्हणून मी तिन्ही जिल्ह्यांत फिरलो, पण चिपळूण नागरी पतसंस्थेच्या सहकार भवनासारखे सुंदर स्ट्रक्चर संपूर्ण तळकोकणात कोठेच दिसले नाही. ही संस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नाही, तर दरवर्षी सहकार दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरासारख्या समाजोपयोगी उपक्रमांतून ती सामाजिक भान जपते आहे. भविष्यात पतसंस्थेच्या चांगल्या उपक्रमांसाठी शासनस्तरावर लागेल ते सहकार्य आम्ही करू, याचे मी वचन देतो.”
ते पुढे म्हणाले, “सुभाषराव चव्हाण यांचं सहकार क्षेत्रातील योगदान मोठं आहे. मला सहकार सम्राट, महर्षी वगैरे व्हायचं नाही, कारण त्यासाठी खूप मोठं योगदान लागतं – आणि ते योगदान कोकणात सुभाषराव चव्हाण यांनी दिलं आहे. चव्हाण साहेबच कोकणातील खरे सहकार महर्षी आहेत.”
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण, वाशिष्टी मिल्कचे चेअरमन प्रशांत यादव, माजी आमदार सदानंद चव्हाण, संचालिका सौ. स्मिताताई चव्हाण, सीईओ सौ. स्वप्ना यादव, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, अॅड. नयना पवार, व्हा. चेअरमन अशोक साबळे, विनोद झगडे, संदीप सावंत, अशोक कदम, सूर्यकांत खेतले, उमेश सकपाळ, रामदास राणे, सोमा गुढेकर, राजेश वाजे, मनोहर मोहिते, सत्यवान म्हामूनकर, राजेंद्र पटवर्धन, डॉ. अभिजीत सावंत आदींचा समावेश होता.
पतसंस्थेच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण १५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी ब्लड सेंटर, रत्नागिरी आणि श्री स्वामी समर्थ ब्लड बँक, बीकेएल वालावलकर हॉस्पिटल डेरवण यांच्या सौजन्याने हे रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिर यशस्वी करण्यासाठी चिपळूण नागरी पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली









