प्रेमजीभाई आसर शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न

चिपळूण, दि. २९ (प्रतिनिधी): चिपळूण-परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालय,चिपळूण या शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव नुकताच संपन्न झाला.
तीन दिवस चाललेल्या या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून युनायटेड स्कूलचे माजी विद्यार्थी श्री.सुहास मनोहर पवार उपस्थित होते.
श्री. सुहास मनोहर पवार हे खेळाडू तसेच मल्लखांब व जिम्नॅस्टिक प्रशिक्षक म्हणून सर्वांना परिचित आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता नाईक यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांनी आपल्या शारीरिक क्षमतांचा विकास कसा केला पाहिजे,खेळाचे महत्त्व आणि खिळाडू वृत्ती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच खेळांच्या विविध प्रकारात महत्त्वपूर्ण कामगिरी करून देशाचे नाव उज्वल करणाऱ्या खेळाडूंविषयी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या सामान्यज्ञान मिळविण्याच्या विचारांना चालना दिली.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.माधव चौरे यांनी करुन दिला. उद्घाटन समारंभा प्रसंगी व्यक्त केलेल्या आपल्या मनोगतातून श्री. पवार यांनी खेळाचे व व्यायामाचे जीवनातील महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि खेळासाठी शुभेच्छा दिल्या.
श्री. पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता नाईक यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन पाहुण्यांचा यांचा सत्कार करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्याचे सूत्रांचालन शाळेचे शिक्षक श्री.आशिष मांडवकर यांनी केले. क्रीडा महोत्सव उद्घाटन प्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ.सिध्दी ठसाळे, सौ. प्राची गगनग्रास, सौ. शर्मिला मोडक तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांच्या १०० मीटर धावणे व संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या १०० मीटर धावणे व संगीत खुर्ची या स्पर्धा झाल्या. तर क्रीडा महोत्सवाची सांगता इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांच्या सांघिक स्पर्धांनी तिसऱ्या दिवशी झाली. यामध्ये मुलींसाठी लंगडी व मुलग्यांसाठी कबड्डीचे सामने झाले.
या क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.

आणखी वाचा