प्रेमजीभाई आसर शाळेत पालक कार्यशाळा संपन्न

चिपळूण, दि. ०७ (प्रतिनिधी): परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या पालकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेसाठी शहरातील डॉ.निनाद साडविलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व उपस्थितांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगीता नाईक यांनी केले. पाहुण्यांची ओळख सौ.प्राची गगनग्रास यांनी करून दिली.
डॉ. साडविलकर यांनी पालकांना आरोग्य विषयी माहिती देतानाच पालकांनी स्वतः मुलांना स्वयंशिस्तीची सवय लावावी, बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरी तयार केलेले पदार्थ मुलांना द्यावेत,आयुर्वेदिक औषधांमुळे आजार मुळापासून दूर होतात, मनुका,बदाम सुकामेवा, ऋतुमानानुसार मिळणारी फळे आवडीने खाण्याची सवय मुलांना लावावी. तूप, मध ,साखर यांचा उपयोग करावा असे मोलाचे मार्गदर्शन केले.
इयत्ता पहिलीच्या ‘पालक कार्यशाळा’ या विशेष उपक्रमातून प्राथमिक शिक्षणाला पाल्याने सुरुवात करताना पालकांना शासनाची ध्येय व धोरणे यांच्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष पाठ्यपुस्तक घेऊन त्यातील पाठ्यांश पालकांसमोर प्रात्यक्षिकाद्वारे प्रदर्शित करण्यात आला. त्यामुळे पालकांना शाळेकडून शालेय अभ्यासाविषयाबरोबरच आपल्या पाल्याचा अभ्यास कसा घ्यावा आणि पालकत्व आपण कसे समृद्ध करावे याविषयी उत्तम माहिती मिळाली. तंत्रज्ञानाचा उपयोग करून पीपीटीद्वारे सर्व मुद्दे उत्तम रीतीने पालकांसमोर मांडण्यात आले.
कार्यशाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे मराठी,गणित इंग्रजी,कला,कार्यानुभव, शारीरिक शिक्षण या विषयांची माहिती देण्यात आली.
उपस्थित पालक वर्गातून सौ. रुपाली सुर्वे यांनी शाळेच्या नवनवीन उपक्रमांचे कौतुक केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या पालक कार्यशाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गशिक्षका सौ.अनुराधा वाचासिध्द,सौ.ज्योती शिंदे,सौ. सीमा चिमणे,सौ.अस्मिता गोरीवले,सौ.राधिका रेडीज यांनी विविध विषयांचे मार्गदर्शन केले. अशा रीतीने इयत्ता पहिलीची कार्यशाळा आनंदात संपन्न झाली.

आणखी वाचा