स्वामिनी सीएनजी युनिटचे कामथे येथे भव्य उद्घाटन; प्रशांत यादव यांच्या नव्या वाटचालीस मान्यवरांचा भरभरून पाठिंबा

चिपळूण, दि. ०४ (प्रतिनिधी): पेट्रोल पंपाच्या यशस्वी कारभारानंतर ‘स्वामिनी पेट्रोलियम’कडून आता सीएनजी इंधन सेवा देण्याचा नवा अध्याय सुरू झाला आहे. कामथे येथील या नव्या सीएनजी युनिटचे उद्घाटन चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण आणि कन्सोर्टीयम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्सचे अध्यक्ष उदय लोध यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटनप्रसंगी मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती होती.

सेवा, विश्वास आणि व्यावसायिक ध्येयधोरण…

या उद्घाटनप्रसंगी बोलताना उदय लोध यांनी स्पष्ट शब्दांत प्रशांत यादव यांच्या व्यावसायिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. “सेवा हीच खरी ताकद असून, पेट्रोल व्यवसायात त्यांनी दाखवलेली शिस्त आणि ग्राहकाभिमुख दृष्टीकोन हेच त्यांना सीएनजी युनिटमध्येही यश देणार आहेत,” असे उदगार त्यांनी काढले.

सुभाषराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात वाशिष्ठी डेअरी प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या रोजगाराच्या संधी, तसेच नव्या सीएनजी युनिटमुळे स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या रोजगाराच्या शक्यता यावर प्रकाश टाकला. “यादव यांनी जे धाडसी पाऊल उचलले आहे, ते परिसरातील तरुणांना नव्या दिशा देणारे ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

इंधनाच्या नव्या पर्वाची सुरुवात

प्रशांत यादव यांनी आपल्या भाषणात या यशामागचे योगदान सर्व सहकाऱ्यांचे, नागरिकांचे आणि ज्येष्ठांचे असल्याचे नमूद करत सीएनजी युनिटबाबत आपल्या पुढील योजना सांगितल्या. “ग्राहकांना प्रतीक्षा न लागता दर्जेदार सेवा मिळावी, यासाठी संपूर्ण व्यवस्था सुसज्ज करण्यात आली आहे. याचबरोबर पुढील टप्प्यात या युनिटजवळच रेस्टॉरंटही उभारण्यात येणार आहे,” अशी माहिती यादव यांनी दिली.

महानगर गॅसचे प्रोजेक्ट मॅनेजर अजित शिंदे यांनी देखील सीएनजीचा वापर इंधनाच्या स्वच्छ पर्याय म्हणून अधिक प्रभावी कसा आहे, याचे विश्लेषण केले. “स्वामिनी युनिटमुळे स्थानिक पातळीवर इंधनासाठी असलेल्या रांगांचा प्रश्न सुटणार असून, ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल,” असे त्यांनी सांगितले.

प्रशांत यादव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

या उद्घाटनप्रसंगी शिवसेना, काँग्रेस, भाजप आदी राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी प्रशांत यादव व त्यांच्या पत्नी सौ. स्वप्ना यादव यांच्यावर भरभरून शुभेच्छांचा वर्षाव केला.

उपस्थितांमध्ये आमदार भास्करराव जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष सतिष मोरे, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, माजी जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे, उद्योजक उदय लोध, नगरसेवक इनायत मुकादम, लियाकत शाह, आणि अनेक मान्यवरांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

या भव्य उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल टाकळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यादव कुटुंबियांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वामिनी पंप’चे सर्व कर्मचारी आणि स्थानिक स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.

एकंदरीत, स्वामिनी सीएनजी युनिटच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यात इंधन व्यवसायाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, या युनिटच्या स्थापनेमुळे स्थानिक पातळीवर विकासाच्या नव्या शक्यताही उलगडणार आहेत.

आणखी वाचा