आकले गावच्या शौर्य वनगेला राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेत रौप्यपदक

चिपळूण, दि. ११ : मुंबई (पनवेल) येथे दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या शालेय राज्यस्तरीय युनिफाईट (कराटे) स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील आकले धामणखोरी–निंबारेवाडी येथील शौर्य प्रसाद वनगे याने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले आहे. या यशामुळे शौर्यचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून आकले गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कठीण स्पर्धकांशी मुकाबला करत शौर्यने आपल्या चपळतेने, तंत्रज्ञानाने व आत्मविश्वासाने प्रतिस्पर्ध्यांना नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला आणि रौप्यपदकावर आपले नाव कोरले.

शौर्य वनगे हा संकल्प फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेचा विद्यार्थी असून त्याला संकल्प स्पोर्ट्सचे प्रशिक्षक मार्शल क्वीन वैशाली बांगर, योगेश वागस्कर, सागर लबडे, अक्षय खोमणे व सुप्रिया तीर्लोटकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मेहनतीचे हे यशस्वी फळ असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

सध्या शौर्य न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग शनिवार पेठ येथे इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. अल्पवयातच राज्यस्तरीय स्पर्धेत मिळवलेले हे यश त्याच्या उज्ज्वल क्रीडा कारकिर्दीची नांदी मानली जात आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल समाजसेवक विनेश भाऊ मोहिते व सामाजिक विकास ग्रुप, आकले यांच्यावतीने शौर्य वनगेला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शौर्यच्या या यशामुळे आकले गावाचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजत असून गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.

आणखी वाचा