खेर्डीतील शिमगोत्सवात ग्रामदेवतेच्या पालखीमध्ये अत्याधुनिक सुविधा

खेर्डी (चिपळूण), दि. ०६ : परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम साधत येथील शिमगोत्सव यंदा विशेष ठरणार आहे. श्री ग्रामदेवी सुखाई देवस्थान येथे ग्रामदेवतेच्या पालखीमध्ये वाय-फाय, सीसीटीव्ही कॅमेरे, लाईव्ह ट्रेकिंग लोकेशन आणि इन्व्हर्टर यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

शिमगोत्सवाच्या पारंपरिक सोहळ्याला सुरक्षितता आणि व्यवस्थापनाची जोड देण्यासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला आहे. देवस्थानचे अध्यक्ष कैलास शेंबेकर तसेच देवस्थानचे विश्वस्त यांच्या पुढाकारातून पालखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्यात आली आहे. यामुळे पालखीच्या मार्गावरील हालचालींचे निरीक्षण करणे सोपे होणार असून भक्तांना पालखीचे लाईव्ह लोकेशन पाहण्याची सुविधा मिळणार आहे.

याशिवाय पालखीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्यामुळे सोहळ्यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीनेही मोठी मदत होणार आहे. वाय-फाय सुविधेमुळे तांत्रिक यंत्रणा सुरळीत कार्यरत राहतील, तर इन्व्हर्टरमुळे वीजपुरवठा खंडित झाला तरीही उपकरणे चालू ठेवता येणार आहेत.

परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला असून भाविकांकडूनही त्याचे स्वागत केले जात आहे. शिमगोत्सवासारख्या पारंपरिक उत्सवात अशा आधुनिक सुविधांचा समावेश केल्यामुळे व्यवस्थापन अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

अध्यक्ष कैलास शेंबेकर तसेच विश्वस्त मंडळाच्या वतीने सांगण्यात आले की, ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाचे आयोजन अधिक सुयोग्य, सुरक्षित आणि आधुनिक पद्धतीने पार पाडण्याचा हा प्रयत्न असून पुढील काळातही अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे.

आणखी वाचा