दापोली, दि. ८ : दापोली नगरपंचायतीकडून शहरातील टपऱ्या, खोके व छोट्या व्यवसायांवर सुरू असलेल्या कारवाईमुळे पथविक्रेते आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. व्यवसाय उभा करण्यासाठी नगरपंचायतीने विविध योजनांतून कर्ज मिळवून दिले आणि आता त्याच व्यावसायिकांच्या व्यवसायांवर कारवाई केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी केला. ‘व्यवसायच बंद केला तर घेतलेले कर्ज फेडायचे कसे?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच सामान्य नागरिकांना पुन्हा गावाकडे आणण्यासाठी ‘रिव्हर्स मायग्रेशन’चा मुद्दा मांडणारे नेते आता कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला.
बुधवारी दापोलीत आयोजित पत्रकार परिषदेत मोरे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. नगरपंचायतीच्या शिफारशीने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत रमेश अनंत तुरे यांना बँक ऑफ इंडिया, दापोली शाखेतून सुमारे ५० हजार रुपयांचे कर्ज मिळवून देण्यात आले. तसेच दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी वृषाली राकेश कदम यांना भाजीपाला विक्रीसाठी अर्थसहाय्य मिळावे यासाठी बँकेकडे शिफारस केली होती. अशाच प्रकारे अनेक पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यात नगरपंचायतीने मदत केली असल्याचे मोरे यांनी सांगितले. मुख्याधिकाऱ्यांनी निर्णायक भूमिका घेतली नाही तर त्यांच्या दालनात बसण्याचा इशाराही त्यांनी दिला.
सत्ताधारी नगरसेवकांच्या भूमिकेवर नाराजी
कारवाई सुरू असताना सत्ताधारी पक्षातील नगरसेवक किंवा पदाधिकारी व्यावसायिकांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहिले नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. मात्र, भाजपच्या नगरसेविका जया साळवी या कारवाईदरम्यान व्यावसायिकांच्या मदतीसाठी धावून आल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या भूमिकेचे उपस्थितांनी कौतुक केले.
धान्य गोदामाची भिंतही पाडली
दरम्यान, अतिक्रमण कारवाईदरम्यान एसटी स्थानकाजवळील पुरवठा विभागाच्या धान्य गोदामाच्या आवारातील कंपाउंडची भिंत जेसीबीच्या धडकेत पडल्याचा आरोप करण्यात आला. तसेच गोदामाच्या आवारातील आंबेकर यांचे सुमारे ४० वर्षांपासून बंद असलेले दुकानही कोणतीही पुरेशी खातरजमा न करता पाडण्यात आल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मंजुरीपेक्षा अधिक जागेत असलेल्या झुणका-भाकर केंद्रावर कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करत, ‘हा दुजाभाव कोणासाठी आणि कशासाठी?’ असा सवाल उपस्थित करण्यात आला. या पत्रकार परिषदेला विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.








