उद्धव ठाकरे सरकारवर झालेल्या अन्यायाचा बदला घेऊया: उध्दवसेना नेते भास्कर जाधव

देवरुख, दि. १२ (प्रतिनिधी)::  लोकांनी निर्णय केलाय, निर्धार केलाय, निश्चय केलाय महायुतीला संपवण्याचा. महाराष्ट्रात झालेला घात, विश्वासघात, खोकेबाजी याची आठवण मतदारांना करून द्यावी लागेल. उमेदवार कोण आहे यापेक्षा ज्यांनी आपल्याला खाली खेचले त्यांना अद्दल घडवायची आहे. आमचा विकास दोन पैशाने कमी झाला तरी चालेल. मात्र आम्ही स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. ज्यांनी पक्षप्रमुखांना खाली ओढले अशांना मतदानातून आपण खाली ओढुया आणि आपल्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचा बदला घेऊया असे प्रतिपादन शिवसेनेचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी देवरुख येथे केले.
     देवरुखातील मराठा भवनात घेण्यात आलेल्या आघाडीच्या कार्यकर्ता प्रचार मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून मंगळवारी दुपारी बोलत होते. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे सरकारवर जोरदार घणाघाती टीका केली. पुढे भास्कर जाधव म्हणाले शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकांना विविध पदे दिली होती. आज पर्यंत त्यांनी कधी काहीच घेतले नाही. आणि महाआघाडी ते मुख्यमंत्री झाले. यावेळी त्यांच्या आजारपणाचा फायदा घेऊन त्यांचा विश्वासघात करण्यात आला. पण तुमच्या नावाची नोंद गद्दार म्हणुन झाली हे महाराष्ट्र विसरणार नाहि असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला.
     पुढे जाधव यांनी गरुडाची कथा सांगितली. यात ते म्हणाले शरद पवार हे गरुड आहेत. ज्याप्रमाणे गरुड आपल्या पिल्लाला खूप उंचीवर घेऊन जाते.आणि त्याला मध्येच सोडुन देते त्याच्या पंखात बळ येण्यासाठी तसेच पवारांनी अजित पवारांना उंचीवर घेऊन गेले. मात्र अजित पवार गेले शरद पवारांच्या पाठिवर बसायला आणि अजित पवारांचा कावळा झाला. शरद पवारांना खर तर त्यांना मोठ्या उंचीवर अजुन नेऊन ठेवायचे होते. मात्र त्यांनी देखील त्यांना दगाच दिला. मात्र आज अवस्था काय झाली आहे अजित पवारांची.
     आम्ही निर्जीव ओंढक्याप्रमाने वाहत जाणारे नसून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला आम्हाला नेहमीच आवडते प्रवाहाच्या विरोधात लढतोय. आणि आपण सारेच स्वाभिमान विकणारे नाही याची खात्री मला आहे. परवा उद्धव ठाकरे यांच्या बॅगा तपासण्यात आल्या. यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले अरे कोणाच्या बॅगा तपासत आहात. यापूर्वी जर का गुहावटीला गेलेल्यांच्या बॅगा तपासल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती असा हि टोला त्यांनी यावेळी लागावला.
      यावेळी व्यासपिठावर माजी राज्यमंत्री रविंद्र माने, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव, माजी आमदार रमेश कदम, माजी आमदार सुभाष बने, उध्दवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने, प्रांतिकच्या सदस्या डॉ. नलिनी भुवड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, नेहा माने, अभिजीत हेगशेट्ये, डॉ. शेखर कोवळे, दत्ताराम लिंगायत, भास्कर बने, नंदादिप बोरुकर, बाबा साळवी, वेदा फडके, संतोष लाड, युयुत्सु आर्ते, दिपिका किर्वे, स्मिता लाड, निलेश भुवड, मुन्ना थरवळ, लियाकत शहा आदि अनेक महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
      प्रस्ताविकात सुरेश बने म्हणाले महाविकास आघाडीची महत्वाची भुमिका भास्कर जाधव वठवित आहेत. त्यांच्या आजच्या सभेमुळे मोठी ताकद मिळणार आहे.
    आघाडीचे उमेदवार प्रशांत यादव म्हणाले जुन्या जाणत्यांकडुन चांगला प्रचार सुरु आहे. आघाडी भक्क्कम आहे. मला उमेदवारी मिळाल्या बद्दल मी ऋणी आहे. मी जबाबदारीने काम करेन आणि जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करेन अस स्पष्ट केले. पुढे यादव म्हणाले ठाकरेंच्या सरकारला धोका देणार्यांबद्दल जनतेत संताप आहे. भास्कर जाधवांच्या आजच्या सभेमुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत. टिका टिप्पणी, आरोप सुरु झाले आहेत. तुमच्या आणि जनतेच्या आशिर्वादामुळे मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ हा विश्वास यादव यांनी व्यक्त केला. विलास चाळके म्हणाले गेलेल्या ४० आमदारांमध्ये निकम देखील आहेत. ते पण गद्दारच आहेत. या गद्दारीचा वचपा काढायचा असेल तर मविआच्या आमदारांना निवडुन आणावेच लागेल. प्रशांत यादव मोठ्या मताधिक्क्याने निवडुन येणारच असाही विश्वास व्यक्त केला.
    राजेंद्र महाडिक म्हणाले हे सरकार गेले पाहिजे असा निर्धार करुन कोकणला वैभव प्राप्त करुन देतील अश्या यादवांना विजयी करुया.माने- बनेंनी शिवसेना वाढवली ती आता वटवृक्षा सारखी झाली आहे.तिच्या सावलीत नक्किच तालुक्यातुन मताधिक्य देऊ असे महाडिक म्हणाले.
 माजी आमदार रमेश कदम म्हणाले आता हे सांगत आहेत २१ शे ते २२ शे कोटी आणले सांगतात. पण ते गेले कुठे..? ठेकेदाराने सुचवलेलीच कामे जास्त झाली. सावर्डे गावातील दूषित पाण्याचा मुद्दा ज्यांना सोडवता आला नाही ते तालुक्यातील प्रश्न काय सोडवणार ? यात पन त्यांनी प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. असा आरोप कदम यांनी केला.
     माजी राज्यमंत्री रवींद्र माने म्हणाले आपल्याला एकच निर्धार करायचा आहे तो म्हणजे जिंकण्याचा. माझी आमदार सुभाषपणे म्हणाले सहकाराची जाण असलेला अभ्यासू नेता आपल्याला निवडून आणावास लागेल एका गब्बर ठेकेदाराने माझ्या कुंडी गावातील काम अद्याप केले नाही असे म्हणतानाच रत्नागिरी जिल्ह्यात चाललेली हुकूमशाही आपल्याला संपायची आहे. आणि संस्कारी, सुसंस्कृत, माणसाचा जिल्हा असलेल्या अशा जिल्ह्यात अशाच प्रकारचा माणूस आपल्याला निवडून आणायचा आहे असहे बने शेवटी म्हणाले.

आणखी वाचा