बंगाल वॉरियर्स संघात संगमेश्वरचा सिद्धेश तटकरे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रो सामन्यांसाठी निवड

देवरुख, दि. ०३ (सचिन मोहिते): एखादं ध्येय उराशी बाळगून त्याचा पाठलाग करणारी ध्येयवेडी माणसं आपलं ध्येय साध्य करतात. अनेकांना असे वाटते ग्लॅमर दुनियेत  आपणही असावं असंच वाटतं, मात्र काही जण तिथपर्यंत पोहोचतात. असाच एक जिद्दि तरुण जिद्द, मेहनत, कठोर परिश्रम, फिटनेस, स्वतावर फोकस करीत अगदी सब ज्युनिअर ते पुढे सीनियर खेळताना जिल्हा विभाग, राज्य आणि त्यानंतर व्यावसायिक संघातून आपला ठसा उमटवून आज तो खेळाडू अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रो कबड्डी पर्यंत पोहोचला आहे. संगमेश्वर तालुक्यातील ताम्हाणे ग्रामीण भागातील (सध्या मुंबई) सिद्धेश प्रमोद तटकरे या कबड्डीपटूची बंगाल वॉरियर्स संघात प्रो कबड्डी मध्ये निवड झाली आहे. प्रो कबड्डीत संगमेश्वर तालुक्यातील पहिलाच खेळाडू म्हणून निवड होण्याचा बहुमान सिद्धेशला मिळाला आहे.
सिद्धेश बंगाल वॉरियर्स प्रो कबड्डी मधील निवडीमुळे आज संगमेश्वर तालुक्यातील अनेकांच्या गळ्यातील ताईत झाला आहे. संगमेश्वर तालुका आणि कबड्डी हे नातं अगदी दृढ आहे. लाल मातीतील या मर्दानी खेळात तालुक्यातील अनेक खेळाडू निर्माण झाले. त्यातील साडवली सह्याद्रीनगर गावातील प्रशांत सुर्वे यांच्यासारखे काही व्यावसायिक खेळाडु म्हणून नावारूपाला आले. लाल माती बरोबरच सध्या प्रो कबड्डी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कबड्डी स्पर्धेला एक ग्लॅमर रूप प्राप्त झाले आहे. आणि ग्रामीण भागातून देखील याच धरतीवर मॅटवर प्रो स्वरूपात कबड्डी स्पर्धा सुरू असतात. प्रत्येक खेळाडूला आपण देखील या ग्लॅमरस दुनियेत जाव, टीव्हीवर खेळताना आपल्यालाही अनेकांनी पहावं अशी इच्छा असते. याकरिता विशेष प्रयत्न करावे लागतात. आणि असेच खास प्रयत्न सिद्धेश तटकरे यांने मुंबई येथे जाऊन केले आणि आज तो सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रो कबड्डी सामन्यात बंगाल वॉरियर्स या संघातून खेळत आहे. ही बाब संगमेश्वर तालुकावाशियांसह जिल्ह्याला अभिमानास्पद अशीच आहे.
संगमेश्वर तालुक्यातील ताम्हणे गावातील सिद्धेश प्रमोद तटकरे याला शालेय जीवनापासून कबड्डी खेळाची आवड. त्याच्या वडिलांना देखील कबड्डीची तितकीच आवड होती आणि इथूनच सिद्धेशच्या कबड्डीच्या प्रवासाला सुरुवात झाली. सिद्धेश हा माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाणेचा विद्यार्थी. ताम्हाणे येथे दहावीपर्यंत शिक्षण घेत असताना विद्यालयातील शिक्षक अभिजीत सप्रे यांच्याकडून त्याला मार्गदर्शन मिळाले. पुढे बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था ज्युनिअर कॉलेजमध्ये ११ वी १२ वी पर्यंत तो शिकला. यावेळी शालेय स्पर्धांमधून सिद्धेशला दादासाहेब सरफरे बुरंबी-शिवने विद्यालयाचे शिक्षक सुहाब पाब्ये यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग स्तरावर खेळू लागला.
याच दरम्यान तो जाखमाता ताम्हाणे संघातून खेळू लागला. याचवेळी असोसिएशनच्या माध्यमातून होणाऱ्या अजिंक्यपद निवड चाचणीतून तो चमकू लागला. काही काळ सिद्धेश सोळजाई देवरुख संघातुन देखील  खेळत होता. यावेळी संतोष उर्फ बाबा दामुष्टे यांचे मार्गदर्शन लाभत होते. यानंतर सिद्धेशाने आपली पावले मुंबईच्या दिशेने वळवली आणि खऱ्या अर्थाने इथूनच सिद्धेशच्या कबड्डीच्या करिअरला अधिकची चालना मिळण्यास सुरुवात झाली.
मुंबईत आल्यावर पदवीचे शिक्षण घेतानाच सिद्धेश जॉब करुन आपली कबड्डीची आवड जोपासू लागला. मुंबईला आल्यावर प्रसिद्ध अंकुर संघामधून खेळू लागला. दरम्यानच्या कालावधीत २०१६ ला तो युनियन बँकेच्या व्यवसायिक संघातून राष्ट्रीय प्रशिक्षक प्रशांत सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत होता. अंकुर संघानंतर, युनियन बँक त्यानंतर न्यू इंडिया इन्शुरन्स यासारख्या व्यवसाय संघात सिद्धेश खेळू लागला.
गत सहामहिन्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या संघातून तो खेळू लागला. या दरम्यान प्रशिक्षक म्हणून प्रशांत सुर्वे, अनिल घाटे, मिलिंद कोलते, सुभाष पाटील, अक्षय मेरठ, महेश साप्ते, मीनल पालांडे, जसपाल राठोड, गणेश म्हात्रे आदींचे मार्गदर्शन मिळाले.
सिद्धेशने आपल्या यशाचे गमक सांगताना म्हटले की मी कधीही सन उत्सव पाहिले नाहित. ‘कुछ पाने के लिए, कुछ खोना पडता है’ या उक्तीप्रमाणे मी माझे ध्येय डोळ्यासमोर ठेवून सन आणि उत्सवाला गौण स्थान दिले. नेहमीच सॅक्रिफाय करत आलो. विशेष म्हणजे फिटनेस महत्त्वाचा असतो तो राखण्यासाठी डायट देखील तेवढेच महत्त्वाचे. आणि स्वतःवर फोकस या गोष्टी करताना कबड्डीचे प्रॅक्टिस करत असताना छोटी छोटी कौशल्य कशाप्रकारे आत्मसात करायची याचे धडे घेतले. फिटनेस साठी विशेष भर देताना फिटनेस ट्रेनर म्हणून प्रशांत साळुंखे यांचे  मार्गदर्शन मिळत आहे. फिटनेस आणि प्रॅक्टिस हे सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होते. ते काही वेळा साडेनऊ वाजेपर्यंत सुरू असते असे तो म्हणाला. मी मनाशी ठरवल्याप्रमाणे आज मला यश मिळाले. याचा आनंद, खुशी ही माझ्याबरोबरच माझ्या कुटुंबीयांना, माझ्या मित्र परिवाराला आणि माझ्या तालुकावाशीयांना झाली आहे. याचाही आनंद अर्वनीय असल्याचे त्याने सांगितले. आपण या साऱ्याने अति आनंदीत असल्याचे स्पष्ट केले. सिद्धेश म्हणतो माझ्या पाठोपाठ अजून संगमेश्वरातील खेळाडूंनी या प्रो कबड्डी मध्ये येण्यासाठी एकत्र खेळा खूप कष्ट करा आणि उद्दिष्ट निश्चित करुन यश गाठा असाहि सल्ला त्याने दिला.
संगमेश्वर तालुक्यातील पहिला खेळाडू प्रो कबड्डी सामन्यात खेळतोय याचे तालुका वासियांना मोठे कौतुक आहे. बंगाल वॉरियर्स संघामध्ये निवड झाल्यानंतर परवा एक मॅच झाली. या दरम्यान तालुक्यातील अनेक कबड्डी रसिकांच्या तोंडामध्ये एकच वाक्य होतं ते म्हणजे आज बंगाल वॉरियर्सचा सामना आहे आणि आपल्याला सिद्धेश कसा खेळतोय हे पाहायचे आहे. इतकं प्रेम देखील सिद्धेशला मिळत आहे. हे सारे ऐकून तो भारावून गेला आहे. त्याच्या निवडीनंतर अनेकांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेक ठिकाणी त्याच्या अभिनंदनाचे बॅनर देखील झळकू लागले. ग्रामीण भागातील एक तरुण खेळाडू एक स्वप्न उराशी बाळगुन ते स्वप्न सत्यात उतरवून यश प्राप्त करत आता प्रसिद्धीच्या शिखरावर पोचला आहे असे म्हटल तर चुकीचे ठरणार नाही. त्याच्या जिद्दीला त्याने पाहिलेल्या स्वप्नाला आणि कष्टाला दाद द्यावी तेवढी थोडी आहे. त्याचा आर्दश घेण्यासारखा आहे.

आणखी वाचा