पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत 3 रुपयांनी वाढ: सर्वसामान्यांवर आर्थिक भार

मुंबई, दि. १६: देशासह राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी ३ रुपयांची वाढ करण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा आणखी मोठा फटका बसला आहे. शुक्रवारपासून लागू झालेल्या या दरवाढीनंतर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर १०६ रुपयांवर, तर डिझेलचा दर ९३ रुपयांवर पोहोचला आहे. वाढत्या इंधन दरांमुळे वाहतूक, अन्नधान्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू तसेच छोट्या व्यावसायिकांच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरवाढीनंतर राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका करत म्हटले की, “मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी दरवाढ करून आधीच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला आणखी संकटात ढकलले आहे. ही दरवाढ अचानक झालेली नाही. पाच राज्यांतील निवडणुका लक्षात घेऊन ती आतापर्यंत रोखून ठेवण्यात आली होती.”

ते पुढे म्हणाले की, “भारत अनेक वर्षांपासून रशियाकडून रुपयांमध्ये तेल खरेदी करत होता. मात्र अमेरिकेच्या दबावामुळे केंद्र सरकारने धोरण बदलले. मोदी सरकार अमेरिकेसमोर पूर्णपणे झुकल्याने त्याचा फटका आता देशातील सामान्य नागरिकांना बसत आहे.”

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते हर्षल प्रधान यांनीही सरकारवर टीका केली. “महागाई रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. पूर्वी आम्ही ‘महंगाई जो रोख न सके वो सरकार निकम्मी है’ अशा घोषणा देत होतो. आज पुन्हा तीच वेळ आली आहे,” असे त्यांनी म्हटले.

दरवाढीचा सर्वाधिक परिणाम छोट्या व्यावसायिकांवर होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. ब्रेड विक्रेते गुलाम हुसेन म्हणाले की, “मी रोज कुर्ल्यापासून सायनपर्यंत दुचाकीवरून ब्रेड आणि पाव पुरवठा करतो. पेट्रोल महागल्याने वाहतूक खर्च वाढणार आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे सरकारला साथ देण्यास हरकत नाही, पण दरवाढ आणखी होऊ नये.”

गृहिणी प्रीती शिंदे यांनी सांगितले की, “सध्या शाळा बंद असल्याने फारसा परिणाम जाणवत नाही. पण शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना शाळेत आणणे-नेणे याचा खर्च वाढेल. देश प्रगती करत असला तरी सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढू नये.”

प्रकाश ओझा यांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करण्याची मागणी केली. “सरकारने कर कमी केल्यास इंधन दर नियंत्रणात राहू शकतात. सध्याची वाढ सर्वसामान्यांसाठी धोकादायक ठरत आहे,” असे ते म्हणाले.

विनीत झांबरे यांनी या भाववाढीला “धक्कादायक” संबोधले. “दरवाढ होणार याची कल्पना होती, पण एवढी वाढ झाल्याने दैनंदिन खर्चाचे गणितच बिघडले आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संतोष रामदास सदभोर यांनीही सरकारच्या आर्थिक धोरणांवर प्रश्न उपस्थित केले. “एका बाजूला महागाई वाढते आहे, पण उत्पन्न मात्र वाढत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. सरकारने महागाई नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, इंधन दरवाढीमुळे सार्वजनिक वाहतूक, मालवाहतूक, किरकोळ बाजारपेठ तसेच शालेय वाहतुकीच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनमानावर होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.

आणखी वाचा