रत्नागिरी, दि. ०६ (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने अनुयायी रत्नागिरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ दाखल झाले होते. मध्यरात्री १२ वाजताच रत्नागिरी तालुक्यातील दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंत सावंत, जिल्हा पदाधिकारी विजय जाधव आणि सहकारी प्रदीप जाधव यांच्या हस्ते आधुनिक भारताचे निर्माते, विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे यंदा नागरिकांनी “वही-पेन आणि शैक्षणिक साहित्य” देऊन बाबासाहेबांना वैचारिक अभिवादन केले.
गुरुवारी ५ डिसेंबरच्या रात्री ११ वाजल्यापासूनच गाव-वाड्यामधून अनुयायी रत्नागिरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दाखल होण्यास सुरुवात झाली होती. तान्हुल्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील अनुयायांच्या पुतळ्याजवळ लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी मद्यरात्री ठीक १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनंत सावंत यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच संयुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुतळ्यास पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पंचशील ग्रहण करून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. रत्नागिरीच्या दिशेने येणारे अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे समता सैनिक दलाचे सैनिक, चळवळीतील कार्यकर्ते, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग ते पुतळा परिसराच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे हजारो अनुयायी पोलिसांना सहकार्य करताना पाहायला मिळाले.









