क्षयरोगमुक्त रत्नागिरीसाठी फिनोलेक्स कंपनीचा पुढाकार ; ‘निश्चय मित्र’ उपक्रमातून उपचाराधीन क्षयरुग्णांना फूड बास्केट किटचे वाटप

रत्नागिरी, दि. १ : क्षयरोगमुक्त रत्नागिरीच्या दिशेने वाटचाल करताना उपचाराधीन क्षयरुग्णांना पोषणाचा आधार मिळावा, यासाठी जिल्हा आरोग्य विभाग आणि फिनोलेक्स कंपनी, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुक्यात ‘निश्चय मित्र’ उपक्रमांतर्गत फूड बास्केट किटचे वाटप करण्यात आले.

फिनोलेक्स कंपनीकडून मागील दोन वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत राजापूर तालुक्यातील उपचाराधीन क्षयरुग्णांना दरमहा फूड बास्केट किट उपलब्ध करून दिले जात आहे. ३१ ऑगस्ट रोजी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी निंबाळकर व त्यांचे सहाय्यक रेवाळे यांच्या उपस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्र ओणी, ग्रामीण रुग्णालय राजापूर आणि प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे येथील रुग्णांना किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी जिल्हास्तरावरून श्रीकांत सावंत, ओणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मदने, राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राम मिस्त्री, धारतळे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. माने तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षयरोगाचे वेळेत निदान, नियमित उपचार आणि पोषणात्मक आधार देण्यावर भर दिला जात आहे. ‘निश्चय मित्र’ उपक्रमातून मिळणारा पोषणाचा आधार रुग्णांच्या उपचार प्रक्रियेला बळ देत असून, फिनोलेक्स कंपनीच्या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाचे यावेळी कौतुक करण्यात आले.

आणखी वाचा