नाशिकमध्ये राहुल गांधींचा काँग्रेस कार्यकर्त्यांना ‘संघटन मंत्र’; आदिवासी विद्यार्थ्यांशीही संवाद

नाशिक, दि. २ सप्टेंबर : काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानांतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या १० दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचा बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. २४ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या शिबिरात संघटनात्मक बांधणी, काँग्रेसची विचारधारा आणि आगामी राजकीय आव्हानांवर चर्चा करण्यात आली.

राहुल गांधी यांचे सकाळी ओझर विमानतळावर आगमन झाले. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर एमटीडीसी रिसॉर्ट येथे राहुल गांधी यांनी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली.

शिबिराच्या समारोपावेळी राहुल गांधी यांनी जिल्हाध्यक्षांशी संवाद साधत संघटन विस्तार आणि काँग्रेसचा विचार जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी जिजित्सू मार्शल आर्ट्सचे प्रात्यक्षिक सादर करून त्याची माहिती दिली.

यावेळी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील आंदोलन करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी राहुल गांधी यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मागण्या त्यांनी जाणून घेतल्या. “प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी सन्मानजनक, सुरक्षित आणि अनुकूल वातावरण मिळणे हा त्याचा अधिकार आहे. वंचित समाजातील विद्यार्थ्यांना व्यवस्थेच्या दुर्लक्षाऐवजी सहकार्य आणि मदतीची गरज आहे. शिक्षण हा विशेषाधिकार नसून भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे,” असे राहुल गांधी यांनी सांगितले.

दहा दिवसांच्या प्रशिक्षणात पक्षाची दिशा, विचारधारा, संघटनात्मक तयारी, देशाच्या राजकारणातील काँग्रेसची भूमिका आणि पक्षासमोरील आव्हानांवर मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील वास्तव समजून घेण्यासाठी दररोज श्रमदान तसेच मनरेगा अंतर्गत प्रत्यक्ष कामाचा अनुभवही शिबिरार्थींना देण्यात आला.

कार्यक्रमाला पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, रजनी पाटील, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, विश्वजित कदम यांच्यासह काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.

आणखी वाचा