आज महामुकाबला! भारत-न्यूझीलंड फायनल; मैदानात उतरताच दोन्ही संघ रचणार इतिहास

अहमदाबाद, दि. ०७ : टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना आज 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. या महामुकाबल्याकडे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले असून मैदानात उतरताच दोन्ही संघ इतिहास रचणार आहेत. आयसीसी स्पर्धांच्या तिन्ही फॉरमॅटच्या अंतिम सामन्यात आमनेसामने येणारे हे जगातील पहिले संघ ठरणार आहेत.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिल्यांदा 2000 साली सामना झाला होता. त्या वेळी स्पर्धेला आयसीसी नॉकआउट असे नाव होते. त्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा चार धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर 2021 मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने आले. त्या सामन्यातही न्यूझीलंडने भारताचा पराभव करत विजेतेपद जिंकले.

मात्र 2025 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत करून हिशेब चुकता केला. आता टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत. त्यामुळे कसोटी, वनडे आणि टी-20 या तिन्ही प्रकारांच्या अंतिम सामन्यात भिडणारे पहिले संघ म्हणून दोन्ही संघांच्या नावावर ऐतिहासिक विक्रम नोंदवला जाणार आहे.

दरम्यान, अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरच्या वक्तव्याने चर्चेला उधाण आले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्याने सांगितले की ट्रॉफी जिंकण्यासाठी काही हृदयं तुटली तरी चालतील. न्यूझीलंडचा संघ सातत्याने चांगली कामगिरी करत असून अंतिम सामना जिंकण्यास ते पूर्णपणे तयार असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला.

टी-20 विश्वचषकातील भारत-न्यूझीलंड रेकॉर्ड पाहिला तर भारतासाठी तो फारसा चांगला नाही. आतापर्यंत टी-20 विश्वचषकात दोन्ही संघ तीन वेळा आमनेसामने आले असून तिन्ही वेळा न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. त्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात हा नकारात्मक विक्रम बदलण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

एकूण टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा विचार केला तर भारताचा वरचष्मा दिसून येतो. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 30 सामने खेळले गेले असून भारताने 18 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 11 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. भारतात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्येही भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे.

या पार्श्वभूमीवर आजचा अंतिम सामना अत्यंत रंगतदार होण्याची शक्यता आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत दमदार कामगिरी केली असून जो संघ त्या दिवशी चांगली कामगिरी करेल तोच टी-20 विश्वचषकाचा नवा विजेता ठरणार आहे.

आणखी वाचा