IPL 2026 चा महासंग्राम 28 मार्चपासून; तिकीट बुकिंगची प्रक्रिया जाणून घ्या

मुंबई, दि. १७ : क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे IPL 2026 चा थरार 28 मार्चपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काही राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयने सध्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्याचेच वेळापत्रक जाहीर केले असून उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर होणार आहे.

यंदाच्या हंगामाचा पहिला सामना 28 मार्च रोजी बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 10 वेगवेगळ्या शहरांमध्ये एकूण 20 सामने खेळवले जाणार आहेत.

तिकीट विक्री लवकरच सुरू
बीसीसीआयने अद्याप अधिकृत तिकीट विक्रीच्या तारखा जाहीर केलेल्या नसल्या तरी मागील हंगामाप्रमाणे लवकरच ऑनलाइन बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे. अनेक फ्रँचायझी आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून तिकीट विक्री केली जाणार आहे.

ऑनलाइन तिकीट कसं बुक करायचं?
बहुतेक तिकीटं ऑनलाइन उपलब्ध असतात. ‘बुक माय शो’वर मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या घरच्या सामन्यांसाठी प्री-सेल नोंदणी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय ‘डिस्ट्रिक्ट बाय झोमॅटो’वरही आयपीएल तिकीटांसाठी स्वतंत्र पेज उपलब्ध होणार आहे.
तिकीट बुक करण्यासाठी संबंधित वेबसाइट किंवा ॲपवर लॉग इन करा, सामना आणि तारीख निवडा, स्टेडियममधील आसन श्रेणी निवडा आणि कार्टमध्ये जोडा. त्यानंतर डेबिट/क्रेडिट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग किंवा वॉलेटद्वारे पेमेंट करा. पेमेंट पूर्ण झाल्यानंतर ई-तिकीट ईमेल किंवा एसएमएसवर मिळते.

ऑफलाइन तिकीट खरेदीची सोय
ऑनलाइन बुकिंग नको असल्यास चाहत्यांसाठी स्टेडियम परिसरात किंवा शहरातील निवडक ठिकाणी तिकीट काउंटरही उघडले जातात. येथे आधार, पॅन किंवा पासपोर्टसारखे ओळखपत्र दाखवून तिकीट खरेदी करता येते. रोख, कार्ड किंवा डिजिटल पद्धतीने पैसे भरून तिकीट त्वरित मिळते.

IPL 2026 च्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी चाहत्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने तिकीट वेळेत बुक करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.

आणखी वाचा