मुंबई, दि. २४ : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या प्लेऑफचे चित्र अखेर स्पष्ट झाले आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सवर ३० धावांनी शानदार विजय मिळवत प्लेऑफमध्ये चौथ्या संघ म्हणून प्रवेश केला. या विजयामुळे पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ जेतेपदासाठी मैदानात उतरणार आहेत.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या ६९व्या साखळी सामन्यात राजस्थानने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ गडी गमावून २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सचा डाव २० षटकांत ९ बाद १७५ धावांवर आटोपला.
या विजयासह राजस्थान रॉयल्सने १६ गुणांसह प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. गुणतालिकेत गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अव्वल स्थानी आहेत. गुजरात टायटन्स दुसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद तिसऱ्या, तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानावर आहेत.
मुंबईविरुद्ध राजस्थानची दमदार कामगिरी
नाणेफेक जिंकल्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानची सुरुवात काहीशी अडखळती झाली. अवघ्या ३३ धावांवर दोन्ही सलामीवीर बाद झाले. मात्र ध्रुव जुरेलने ३८ धावांची संयमी खेळी करत डाव सावरला. त्यानंतर जोफ्रा आर्चरने खालच्या फळीत येत तुफानी ३२ धावांची खेळी केली आणि राजस्थानला २०५ धावांचा मजबूत टप्पा गाठून दिला.
मुंबईकडून दीपक चहर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. विल जॅक्स, कॉर्बिन बॉश आणि गझनफर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
सूर्यकुमारचे अर्धशतक व्यर्थ
२०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली. रोहित शर्मा शून्यावर बाद झाला. ३८ धावांत चार महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यानंतर मुंबई संकटात सापडली. सूर्यकुमार यादव आणि विल जॅक्स यांनी पाचव्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करत सामना रंगतदार केला.
विल जॅक्स ३३ धावांवर बाद झाला, तर हार्दिक पांड्या ३४ धावा करून माघारी परतला. सूर्यकुमार यादवने ६० धावांची झुंजार खेळी केली, मात्र त्याला साथ मिळाली नाही. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने तीन बळी घेत मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडले. नंद्रे बर्गर, ब्रजेश शर्मा आणि यशराज पुंजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
प्लेऑफचे वेळापत्रक जाहीर
आता आयपीएल २०२६ च्या प्लेऑफ सामन्यांना सुरुवात होणार आहे. क्वालिफायर-१ मध्ये अव्वल दोन संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने येतील. या सामन्याचा विजेता थेट अंतिम फेरीत पोहोचेल.
एलिमिनेटरमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होईल. या सामन्यातील विजेता क्वालिफायर-२ मध्ये प्रवेश करेल. त्यानंतर क्वालिफायर-१ मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरचा विजेता अंतिम फेरीतील दुसऱ्या स्थानासाठी भिडतील.
सामने कुठे होणार?
क्वालिफायर-१ धर्मशाळातील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल. एलिमिनेटर आणि क्वालिफायर-२ हे सामने न्यू चंदीगडच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होतील. तर ३१ मे रोजी अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे.
प्लेऑफ वेळापत्रक :
🔹 क्वालिफायर-१ : २६ मे – आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स (धर्मशाळा)
🔹 एलिमिनेटर : २७ मे – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (न्यू चंदीगड)
🔹 क्वालिफायर-२ : २९ मे – क्वालिफायर-१ पराभूत विरुद्ध एलिमिनेटर विजेता (न्यू चंदीगड)
🔹 अंतिम सामना : ३१ मे – अहमदाबाद
राजस्थानच्या दमदार पुनरागमनामुळे आयपीएल २०२६ च्या प्लेऑफमध्ये आता रंगत आणखी वाढली आहे. क्रिकेटप्रेमींचे लक्ष आता अंतिम फेरीच्या रोमांचक लढतींकडे लागले आहे.








