चिपळूण, दि. ४ : रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य विभागाला हादरा देणाऱ्या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन मदार यांना ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर काही तासांतच पडताळणी करून सापळा रचण्यात आल्याने या कारवाईची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला गर्भवती असून त्यांना गर्भपात करावयाचा होता. त्यासाठी त्यांनी बुधवारी (दि. ३ जून) कामथे उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉ. मदार यांची भेट घेतली होती. गर्भपातासाठी आवश्यक असलेले औषधांचे किट उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. मदार यांनी ४ ते ५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप संबंधित महिलेने एसीबीकडे केला.
तक्रारीची तात्काळ पडताळणी करण्यात आली असता, डॉ. मदार यांनी ४ हजार ५०० रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. बुधवारी सायंकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान तक्रारदार महिलेकडून ४ हजार ५०० रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचांसमक्ष डॉ. मदार यांना ताब्यात घेतले.
विशेष म्हणजे, ही रक्कम रुग्णालयाच्या परिसरात नव्हे तर डॉ. मदार यांच्या खासगी चारचाकी वाहनात (एमएच-०८ एएक्स-२६१८) स्वीकारण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे सरकारी आरोग्य सेवेशी संबंधित आर्थिक व्यवहारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तक्रार दाखल झाल्याच दिवशी पडताळणी आणि सापळा कारवाई पूर्ण करण्यात आल्याने ही अलीकडील काळातील जिल्ह्यातील सर्वात वेगवान कारवाईंपैकी एक मानली जात आहे. या प्रकरणी डॉ. मदार यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या व्यवहारामागे अन्य कोणी सहभागी आहे का तसेच यापूर्वी अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या का, याचाही तपास सुरू आहे.
ही कारवाई एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास रोकडे, मच्छिंद्र जाधव, उदय चांदणे, संजय वाघाटे, विशाल नलावडे, दीपक आंबेकर, श्रेया विचारे, हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षिरसागर आणि प्रशांत कांबळे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
वरिष्ठ गायनॅकोलॉजिस्ट अधिकारी
डॉ. कांचन मदार या एमबीबीएस, एमडी शिक्षणानंतर एमपीएससीमध्ये उल्लेखनीय यश मिळवून महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात दाखल झाल्या होत्या. गेली सुमारे २५ वर्षे त्या विविध पदांवर कार्यरत असून वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक तसेच वरिष्ठ वर्ग-एक गायनॅकोलॉजिस्ट अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.
२०१५ मधील आरोपांची पुन्हा चर्चा
दरम्यान, डॉ. मदार यांचे नाव यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. सन २०१५ मध्ये चिपळूण पंचायत समितीच्या बैठकीत प्रसूतीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांकडून दोन ते चार हजार रुपयांची अवैध वसुली केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्या आरोपांमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. त्यावेळी निलंबनाच्या कारवाईपर्यंत विषय पोहोचल्याची चर्चा होती.
आता एसीबीच्या ताज्या कारवाईनंतर त्या जुन्या आरोपांची पुन्हा उजळणी सुरू झाली असून, आरोग्य व्यवस्थेतील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि रुग्णांच्या हक्कांच्या संरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
टीप : एसीबीने केलेली कारवाई ही प्राथमिक तपास आणि सापळा कारवाईवर आधारित असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच संबंधित व्यक्तीचा दोष किंवा निर्दोषत्व निश्चित होईल.








