खेड (लोटे), दि. ०५ : लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीत प्रस्तावित पीएफएएस (PFAS) रसायन उत्पादनाच्या विरोधात आज ६ एप्रिल रोजी भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. “पर्यावरण व आरोग्य वाचवा – पीएफएएस हटवा” या घोषणेखाली कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त विद्यमाने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
आयोजकांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, पीएफएएससारख्या घातक रसायनांच्या उत्पादनामुळे पर्यावरण, पाणी, माती आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पाला तात्काळ विरोध नोंदवत स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, या मोर्चामागील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत —
पीएफएएससारख्या घातक रसायनांचे उत्पादन करणारी कंपनी तात्काळ बंद करावी.
प्रदूषणाबाबत सखोल चौकशी करून जबाबदारांवर कडक कारवाई करावी.
दूषित पाणी, माती व आरोग्यविषयक परिणामांवर स्वतंत्र वैज्ञानिक अहवाल जाहीर करावा.
स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका पोहोचणार नाही, याची हमी द्यावी.
तात्काळ जनसुनावणी घेऊन स्थानिकांचे मत विचारात घ्यावे.
“आपण येणार – मोर्चा यशस्वी करणार” असा निर्धार व्यक्त करत या आंदोलनात ग्रामस्थ, तरुण, महिला, शेतकरी, मच्छीमार, कामगार आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हा मोर्चा आज सोमवार, ६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता परशुराम एनर्जी एक्सेल फाटा ते लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनी या मार्गावर काढण्यात येणार आहे.
दरम्यान, “लक्ष्मी कंपनी हटवा – कोकण वाचवा” असा नारा देत या आंदोलनाला व्यापक लोकसमर्थन मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. स्थानिक पातळीवर या मोर्चाबाबत उत्सुकता वाढली असून, प्रशासनाचेही या घडामोडींवर लक्ष लागले आहे.या महामोर्चाचे आयोजन कोक ण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि जनआक्रोश समिती यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. तसेच या आंदोलनाचे आयोजक श्री. अशोकराव जाधव, श्री. राजेंद्र आंब्रे, श्री. सचिन चाळके, श्री. अविनाश आंब्रे, श्री. रविंद्र गोळवणकर आणि श्री. दिलीप घाग हे आहेत.









