मान्सून २०२६ साठी कोकण रेल्वे सज्ज; प्रवासी सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

रत्नागिरी, दि. १२ : कोकणातील निसर्गरम्य मान्सून जितका मोहक असतो, तितकाच तो रेल्वे वाहतुकीसाठी आव्हानात्मकही ठरतो. मुसळधार पाऊस, डोंगराळ भूप्रदेश आणि भूस्खलनाच्या संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी कोकण रेल्वेने मान्सून २०२६ साठी व्यापक तयारी पूर्ण केली असून प्रवासी सुरक्षा आणि अखंड रेल्वे वाहतूक यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.

कोकण रेल्वेने पायाभूत सुविधा बळकटीकरण, भू-सुरक्षा उपाययोजना, अत्याधुनिक निरीक्षण प्रणाली, विशेष गस्त आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा यांचा समावेश असलेली सर्वसमावेशक मान्सून कृती योजना राबविली आहे. १५ जून ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू राहणार असून सुरक्षित रेल्वे संचालनासाठी विविध विभागांमध्ये वेगमर्यादा लागू करण्यात येणार आहेत.

पायाभूत सुविधा आणि भू-सुरक्षा उपाय

ओळखण्यात आलेल्या संवेदनशील ठिकाणी उतार सपाटीकरण (Flattening of Slopes), सॉइल नेलिंग, रॉक बोल्टिंग आणि शॉटक्रीटिंगची कामे करण्यात आली आहेत. बोगदे आणि कापलेल्या डोंगरभागांमध्ये दगड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

तसेच गॅबियन वॉल, रिटेनिंग वॉल, मायक्रोपाइल्स आणि बोल्डर नेटिंग यांसारख्या संरक्षक संरचना उभारण्यात आल्या आहेत. पाण्याचा निचरा सुरळीत राहावा यासाठी साइड ड्रेन्स आणि कॅचवॉटर ड्रेन्सची स्वच्छता व काँक्रीट अस्तरीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

या सातत्यपूर्ण उपाययोजनांमुळे मागील दशकभरात मान्सून काळात दगड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेच्या वाहतुकीत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली.

६५७ कर्मचाऱ्यांची विशेष गस्त

मान्सून काळात संवेदनशील ठिकाणी ६५७ प्रशिक्षित कर्मचारी चोवीस तास गस्त घालणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसादासाठी चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि वेरणा येथे बीआरएन वॅगनवर बसविलेले उत्खनन यंत्र (Excavators) तैनात करण्यात आले आहेत.

रेल्वे मार्गाच्या देखभालीसाठी वीर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कुडाळ, वेरणा, कारवार, भटकळ आणि उडुपी येथे रेल मेंटेनन्स व्हेईकल्स (RMV) सज्ज ठेवण्यात आले आहेत.

सुरक्षा लक्षात घेऊन विशेष संचालन

दृश्यता कमी झाल्यास लोको पायलटना रेल्वेचा वेग ४० किमी प्रतितास इतका मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रेल्वे रुळांवर पाण्याची पातळी १०० मिमीपेक्षा जास्त झाल्यास गाड्या थांबवून परिस्थिती सामान्य झाल्यानंतरच वाहतूक सुरू करण्यात येईल.

वैद्यकीय आणि आपत्कालीन मदत व्यवस्था

माणगाव, दिवाणखवटी, चिपळूण, संगमेश्वर रोड, वैभववाडी रोड, कुडाळ, मडगाव, काणकोण, कारवार, भटकळ आणि उडुपी येथे अपघात निवारण वैद्यकीय उपकरणे (ARME) उपलब्ध ठेवण्यात आली आहेत.

रत्नागिरी आणि वेरणा येथे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरसह स्वयंचलित अपघात निवारण वैद्यकीय व्हॅन्स (ARMV) तैनात आहेत. वेरणा येथे अपघात निवारण रेल्वे (ART) केवळ १५ मिनिटांत रवाना होण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहे.

अत्याधुनिक संप्रेषण यंत्रणा

सुरक्षा कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन, लोको पायलट व ट्रेन मॅनेजरना वॉकी-टॉकी देण्यात आले आहेत. सर्व स्थानकांवर २५ वॅट व्हीएचएफ संच कार्यरत आहेत.

आपत्कालीन संपर्कासाठी संपूर्ण मार्गावर दर एक किलोमीटर अंतरावर तसेच दोन किलोमीटरपेक्षा मोठ्या बोगद्यांमध्ये प्रत्येक ४०० मीटरवर इमर्जन्सी कम्युनिकेशन सॉकेट्स (EMC) बसविण्यात आले आहेत. ART आणि ARMV मध्ये उपग्रह दूरध्वनी (Satellite Phones) उपलब्ध आहेत.

तंत्रज्ञानाच्या मदतीने सतत निरीक्षण

माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकळ आणि उडुपी या नऊ स्थानकांवर स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत.

घोड, काली, सावित्री आणि वशिष्ठी नद्यांवरील महत्त्वाच्या पुलांवर पूर इशारा प्रणाली कार्यरत असून धोकादायक पाणीपातळीची माहिती त्वरित अधिकाऱ्यांना मिळणार आहे.

पनवळ व्हायाडक्ट, मांडवी पूल, झुआरी पूल आणि शरावती पूल येथे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी अ‍ॅनेमोमीटर बसविण्यात आले आहेत.

२४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव येथे चोवीस तास नियंत्रण कक्ष सुरू ठेवण्यात आले आहेत. कोकण रेल्वेच्या सर्व ७२ स्थानकांवरील सीसीटीव्ही यंत्रणांवर सातत्याने नजर ठेवली जात आहे.

भारतीय हवामान विभागाशी (IMD) समन्वय साधून दररोज हवामानाचा आढावा घेतला जात असून क्षेत्रीय अधिकाऱ्यांना एसएमएसद्वारे सतर्कतेचे संदेश पाठविले जात आहेत.

प्रवाशांसाठी सुविधा

प्रवाशांना रेल्वे गाड्यांची अद्ययावत माहिती www.konkanrailway.com या संकेतस्थळावर तसेच १३९ हेल्पलाइन क्रमांकावर उपलब्ध होणार आहे.

कोकण रेल्वे प्रशासनाने सांगितले की, व्यापक तयारी, आधुनिक तंत्रज्ञान आणि सतत निरीक्षणाच्या माध्यमातून मान्सून २०२६ दरम्यान सुरक्षित, विश्वासार्ह आणि अखंड रेल्वे सेवा देण्यासाठी कोकण रेल्वे पूर्णपणे सज्ज आहे.

आणखी वाचा