मुंबई, दि. २९ : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचसाठी ४५९ पदे निर्माण करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर येथे १ ऑगस्ट २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार मुंबई उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठ स्थापन करण्यात आले असून, १८ ऑगस्ट २०२५ पासून त्याचे कामकाज सुरू झाले आहे. सध्या या खंडपीठासाठी मुंबई मुख्यपीठ तसेच नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठातील कर्मचाऱ्यांची सेवा घेण्यात येत आहे.
कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्वतंत्र आणि प्रभावी कामकाजासाठी गट-अ ते गट-ड संवर्गातील ४५९ पदे निर्माण करण्याचा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने शासनाकडे सादर केला होता. त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
यामध्ये गट-अची २०, गट-बची ३५, गट-कची २७६ आणि गट-डची १२८ पदे आहेत. गट-अमध्ये प्रबंधक, उपप्रबंधक, सहायक प्रबंधक, आयटी सहायक प्रबंधक, ग्रंथपाल आदी पदांचा समावेश आहे. गट-बमध्ये कक्ष अधिकारी, सॉफ्टवेअर व हार्डवेअर इंजिनिअर तसेच वरिष्ठ भाषांतरकारांची पदे आहेत.
गट-कमध्ये सहायक कक्ष अधिकारी, लिपिक, लघुलेखक, कनिष्ठ भाषांतरकार, वाहन चालक आदी २७६ पदे, तर गट-डमध्ये शिपाई, हमाल, पहारेकरी, स्वयंपाकी, माळी, सफाईगार, उद्वाहनचालक आदी १२८ पदांचा समावेश आहे.
या पदांच्या निर्मितीसोबतच त्यासाठी येणाऱ्या खर्चासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर सर्किट बेंचच्या प्रशासकीय कामकाजाला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होऊन त्याच्या नियमित कार्यक्षमतेला चालना मिळणार आहे.








