कोकण रेल्वेची कोलाड-वर्ना दरम्यान ‘रो-रो’ कार वाहतूक सेवा सुरू

रत्नागिरी, दि. २१ : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) कोलाड (महाराष्ट्र) ते वर्ना (गोवा) दरम्यान खासगी कारधारकांसाठी नवीन ‘रो-रो’ (Roll-on Roll-off) सेवा सुरू केली आहे. ही सेवा २३ ऑगस्टपासून कोलाडहून आणि २४ ऑगस्टपासून वर्नाहून सुरू होणार आहे.
या सेवेद्वारे वाहनधारकांना त्यांची कार रेल्वेने सोबत नेत सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करता येणार आहे. ही सेवा एक दिवसाआड सुरू राहणार असून, सायंकाळी ५ वाजता गाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता पोहोचेल. प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या तीन तास आधी म्हणजे दुपारी २ वाजेपर्यंत स्थानकावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.
विशेष डिझाईन केलेल्या वॅगनमध्ये प्रत्येकी दोन अशा २० वॅगनमध्ये एकूण ४० कारची व्यवस्था आहे. एका कारसाठी ₹७,८७५/- इतका भाडे (GST सहित) असून, नोंदणीवेळी ₹४,०००/- आगाऊ भरावे लागतील. उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी भरणे आवश्यक आहे.
कारमधून कमाल तीन प्रवासी 3AC किंवा सेकंड सीटिंग कोचमध्ये प्रवास करू शकतात. त्यासाठी भाडे अनुक्रमे ₹९३५/- (3AC) व ₹१९०/- (सेकंड सीटिंग) आहे.
ही सेवा ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत सुरू राहणार असून, बुकिंग २१ जुलैपासून १३ ऑगस्टपर्यंत खुले राहणार आहे. नोंदणी कोकण रेल्वेच्या बेलापूर (नवी मुंबई) कार्यालयात किंवा वर्ना रेल्वे स्थानकात करता येईल. UPI व रोख व्यवहाराची सुविधा उपलब्ध आहे.
१६ पेक्षा कमी कारची नोंदणी झाल्यास सेवा रद्द करण्यात येईल आणि आगाऊ रक्कम परत केली जाईल.
अधिक माहितीसाठी www.konkanrailway.com या संकेतस्थळावर किंवा
बेलापूर कार्यालय: ९००४४७०९७३
वर्ना स्टेशन: ९६८६६५६१६०
या क्रमांकांवर संपर्क साधावा.

आणखी वाचा