रत्नागिरी, दि. १३ : कोकण रेल्वे महामंडळाने विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी तिकीट तपासणी मोहिमेला अधिक गती दिली असून फेब्रुवारी २०२६ महिन्यात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या कालावधीत नियमित तपासणीसह एकूण ८७३ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या मोहिमांदरम्यान ४१ हजार ५२२ विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नोंद करण्यात आली असून त्यांच्याकडून रेल्वे भाडे व दंडापोटी एकूण २ कोटी ४१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.
कोकण रेल्वेच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत एकूण १० हजार ३६८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा घेण्यात आल्या आहेत. या कारवाईत ४ लाख ५४ हजार ८४९ विनातिकीट किंवा अनियमित प्रवास करणारे प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून रेल्वे भाडे आणि दंडापोटी एकूण २५ कोटी २१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे. विनातिकीट किंवा चुकीच्या तिकीटावर प्रवास केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते, त्यामुळे प्रवासापूर्वी योग्य तिकीट काढणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
येत्या सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कोकण रेल्वेने तिकीट तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे संरक्षण दल (RPF) तसेच रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण मार्गावर विशेष तपासणी मोहिमा राबवण्यात येणार आहेत. या उपक्रमामुळे वैध तिकीटधारक प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा, हा रेल्वे प्रशासनाचा उद्देश असल्याचेही सांगण्यात आले आहे.








