रत्नागिरी, दि. ०३ : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने गतवर्षभरात कनेक्टिव्हिटी, सुरक्षितता आणि प्रवासी सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विक्रमांचे वर्ष नोंदवले आहे. पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला अनुसरून कोकण रेल्वेने पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात मोठी झेप घेतली असून, यामुळे कोकण पट्ट्यातील आर्थिक विकासालाही चालना मिळाली आहे.
“यंदाच्या यशामध्ये ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्वाची प्रभावी अंमलबजावणी दिसून येते. जागतिक दर्जाच्या रेल्वे सुविधांच्या माध्यमातून आम्ही देशाच्या विकासात योगदान देत आहोत,” असे मत कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी व्यक्त केले.
प्रवासी व महसूल वाढीचा विक्रम
गत आर्थिक वर्षात कोकण रेल्वे मार्गावर प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ झाली. तिकीट तपासणीद्वारे मिळालेल्या महसुलानेही विक्रम प्रस्थापित केला असून तो तब्बल २७.५९ कोटी रुपयांवर पोहोचला. ‘देव दर्शन’ विशेष गाडी सुरू करण्यात आली असून, रंजनगाव, अयोध्या आणि रामेश्वरम या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या ६ एफटीआर सेवा देण्यात आल्या.
अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधांमध्ये प्रगती
कोकण रेल्वेने यूएसबीआरएल प्रकल्पात महत्त्वपूर्ण टप्पा गाठत राष्ट्रीय कनेक्टिव्हिटी मजबूत केली आहे. तसेच पूल, बोगदे आणि सिग्नलिंग प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यात आले असून, अवघड भौगोलिक परिस्थितीतही सुरक्षितता आणि कार्यक्षमतेत वाढ झाली आहे.
RoRo (Roll-on Roll-off) सेवेत मालवाहतूक क्षमता ५० मेट्रिक टनांवरून ५७ मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्यात आली आहे. मडगाव स्थानकावर ‘रोड-६’ लाईनचा विस्तार करण्यात आल्याने इंजिन बदल प्रक्रिया अधिक सुलभ झाली आहे. ड्रोनच्या सहाय्याने ट्रॅक तपासणीसारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून देखभाल वेळेत बचत करण्यात आली आहे.
प्रवाशांसाठी विशेष उपक्रम
गतवर्षी विविध सण आणि हंगामानिमित्त १,४०० विशेष गाड्या चालवण्यात आल्या. यामध्ये ३७६ गणपती विशेष, १८५ उन्हाळी, ८६ हिवाळी विशेष गाड्यांसह इतर सेवांचा समावेश आहे.
दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प, ब्रेल सूचना आणि आधुनिक साईनबोर्डची सुविधा कर्मळी, थिवीम, कारवार, मुरुडेश्वर आणि उडुपी स्थानकांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ७३० विद्यार्थ्यांसाठी रेल्वे जनजागृती अभियानही राबवण्यात आले.
गणेशोत्सव काळात प्रथमच सजावटीचे स्टॉल, यात्रिक सहाय्य बूथ, मोफत पाणी, आरोग्य सेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
स्थानक विकासाला गती
खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, थिवीम, कर्मळी, मडगाव, कारवार, मुकांबिका रोड बिंदूर आणि उडुपी या १० स्थानकांवर एसी लाऊंज सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. सावंतवाडी रोड आणि रत्नागिरी येथे ‘रेल आर्केड’ विकसित करण्यात आले आहे.
रत्नागिरी, थिवीम आणि उडुपी येथे डिजिटल लॉकर सुविधा उपलब्ध झाली आहे. वैभववाडी रोड येथे फूट ओव्हर ब्रिजचे काम पूर्ण झाले असून, कुमटा आणि गोकर्ण येथे उंच प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आले आहेत. सुरतकल, उडुपी आणि मुळकी स्थानकांवर शेड आणि प्लॅटफॉर्म सुधारणा करण्यात आल्या आहेत.
तंत्रज्ञान आणि शाश्वततेकडे वाटचाल
कोकण रेल्वेने ३.६७ लाख युनिट सौरऊर्जा निर्मिती करून सुमारे ४५.९४ लाख रुपयांची बचत केली आहे. पर्यावरणपूरक उपक्रमांवर विशेष भर देण्यात येत आहे.
सुरक्षा आणि संरक्षेमध्ये वाढ
रेल्वे सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत. चोरीच्या ९२ प्रकरणांची नोंद करून ३५.७३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच ९० हरवलेल्या मुलांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले.
कारवार आणि रत्नागिरी विभागात सुमारे २,७०० मीटर लांबीचे ‘कॅटल रन-ओव्हर’ प्रतिबंधक कुंपण उभारण्यात आले आहे. यामुळे जनावरांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये घट होण्यास मदत झाली आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा ५ नवीन स्थानकांवर बसवण्यात आली असून, आणखी ५ स्थानकांवर ती अद्ययावत करण्यात आली आहे.
कोकण रेल्वेने सुरक्षितता, कार्यक्षमता आणि प्रवासी-केंद्रित सेवा यावर भर देत पुढील वाटचाल सुरू ठेवली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि सामाजिक जबाबदारी यांच्या आधारे कोकण रेल्वे देशाच्या विकासात मोलाचे योगदान देत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








