लांजा, दि. १९ : लांजा तालुक्यातील कांटे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत शाळेच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या शिबिरात शाळेतील विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांची सखोल नेत्र तपासणी करण्यात आली. तज्ज्ञांकडून डोळ्यांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. लहान वयातच डोळ्यांच्या समस्यांची ओळख होऊन त्यावर वेळेत उपचार करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शिबिराला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेकांनी या उपक्रमाचे स्वागत करत अशा शिबिरांची गरज व्यक्त केली. तपासणीदरम्यान काहींना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इन्फिगो हॉस्पिटलचे कर्मचारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रार्थना सचिन देसाई, शिक्षक श्री. पंकज कुशिनाथ खडांगळे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. प्रज्ञा श्रीकांत लोंढे, माजी शिक्षक श्री. निगुडकर, आशा सेविका सौ. अनघा रेऊरकर तसेच समिती सदस्य आणि शिक्षक-विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.
या शिबिरामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि ग्रामस्थांच्या डोळ्यांच्या आरोग्याची तपासणी होऊन त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.








