मुंबई : खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मिळाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या आणि पर्यावरणीय चिंतेची दखल घेत, या लढ्याला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती आणि जनआक्रोश समितीच्या प्रतिनिधींनी मुंबईत जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी कंपनीकडून ‘पी-फास’ (PFAS) सारख्या घातक रसायनांचे उत्पादन सुरू असल्याचा आरोप करत, यामुळे कोकणातील पर्यावरण, जलस्रोत आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, हा लढा कोणत्याही राजकीय हेतूने नसून केवळ कोकणचा निसर्ग, शेती, पाणी आणि स्थानिकांचे जीवन वाचवण्यासाठी उभारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मनसेने या जनआंदोलनाच्या पाठीशी उभे राहावे, अशी मागणी केली होती.
यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले, “जिथे जिथे गरज लागेल, तिथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या सोबत ठामपणे उभी राहील.” त्यांच्या या भूमिकेमुळे आंदोलनकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनीही या आंदोलनाला पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत, हा लढा जनहिताचा असल्याचे अधोरेखित केले.
या बैठकीला मनसेचे दक्षिण मुंबई संपर्क उपाध्यक्ष मनीष पात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे खेड तालुका अध्यक्ष मंगेश चाळके, तसेच लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती, कोकण नागरी संघर्ष समिती, जनआक्रोश समितीचे पदाधिकारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधातील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, मनसेच्या पाठिंब्यामुळे या संघर्षाला नवे राजकीय आणि सामाजिक बळ मिळाल्याचे चित्र आहे.








