ठाकरे सेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांची मंजुरी

नवी दिल्ली, दि. 19 : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून, पक्षातून फुटून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या सहा खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे संबंधित सहा खासदारांचे शिंदे यांच्या शिवसेनेत झालेले विलीनीकरण कायदेशीरदृष्ट्या वैध ठरले आहे.

शिंदे गटात दाखल झालेल्या खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर (धाराशिव), संजय दिना पाटील (मुंबई दक्षिण-ईशान्य), संजय देशमुख (यवतमाळ-वाशीम), संजय जाधव (परभणी), भाऊसाहेब वाकचौरे (शिर्डी) आणि नागेश पाटील आष्टीकर (हिंगोली) यांचा समावेश आहे. पक्षांतरानंतर या खासदारांनी प्रथम लोकसभेत स्वतंत्र गट स्थापन केला आणि त्यानंतर शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याचा निर्णय घेतला होता.

लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वेळेत दिला असता तर अशा घटना घडल्या नसत्या, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. लोकसभा अध्यक्षांचा निर्णय लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया देताना, “आम्ही यापूर्वीही अन्याय सहन केला आहे. आज संपूर्ण देश तोच अनुभव घेत आहे,” असे म्हणत केंद्र सरकार आणि लोकसभा अध्यक्षांवर टीका केली.

दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. “हे खासदार आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आमच्यासोबत आले आहेत. त्यांच्या मतदारसंघांतील विकासकामांना सरकारकडून प्राधान्य दिले जाईल,” असे त्यांनी सांगितले.

या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून, महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा