नापणे धबधब्यावर राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे भव्य उद्घाटन

सिंधुदुर्ग, दि. २३ (प्रतिनिधी) : निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या वैभववाडी तालुक्यातील नापणे धबधब्याच्या सौंदर्यात आता आणखी एक आकर्षण जोडले गेले आहे. राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाच्या उद्घाटनाने या प्रसिद्ध धबधब्याला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनविण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले गेले आहे. हा ऐतिहासिक क्षण मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी साधून, त्यांना एक आगळीवेगळी भेट देण्यात आली आहे.
‘सिंधु-रत्न योजना’ अंतर्गत साकारण्यात आलेल्या या भव्य प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे युवा व तडफदार पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना मंत्री राणे म्हणाले, “धबधब्यावरील हा काचेचा पूल हे केवळ सिंधुदुर्गसाठीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. पर्यटनवाढीच्या दृष्टीने हे एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी हे उद्घाटन होत असल्याने त्यांना ही एक प्रकारची प्रत्यक्ष कृतीतून दिलेली अनोखी शुभेच्छा आहे.”
ते पुढे म्हणाले, “विकास आणि देवेंद्र फडणवीस हे एक वेगळंच समीकरण आहे. त्यांचं नेतृत्व हे प्रेरणादायी असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यालाही पर्यटन क्षेत्रात जागतिक ओळख मिळवून देता येईल.”
काचेचा पूल — सौंदर्य आणि सुरक्षिततेचा संगम
हा पूल केवळ आकर्षकच नाही, तर अत्यंत सुरक्षितही असून, पर्यटकांना धबधब्याच्या पाण्यावरून चालण्याचा थरार अनुभवता येणार आहे. पुलाच्या उभारणीसाठी आधुनिक अभियांत्रिकीचा वापर करण्यात आला असून, सुरक्षा आणि सल्लागार समित्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण बांधकाम पार पडले आहे.
राणे यांनी पर्यटकांना आवाहन केलं की, “पुलाचा आनंद घ्या, पण शासनाने ठरवलेल्या सर्व नियमांचे पालन करा. ही एक जबाबदारीही आहे.”
पर्यटन सुविधांचा टप्प्याटप्प्याने विकास
राणे यांनी स्पष्ट केलं की, “या परिसरात पार्किंग, हॉटेल सुविधा, दिशादर्शक फलक यांसारख्या सुविधा ग्रामस्थांच्या सल्ल्याने आणि सहकार्याने विकसित केल्या जातील. स्थानिक रोजगाराच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.”
उपस्थित मान्यवरांची उपस्थिती
या भव्य उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, तसेच प्रमुख स्थानिक नेते आणि सरपंचगण उपस्थित होते. ग्रामस्थ आणि पर्यटकही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले.
उद्घाटनानंतर मंत्री नितेश राणे यांनी काचेच्या पुलावरून स्वतः फेरफटका मारून पाहणी केली. पर्यटकांनी देखील पुलावरून धबधब्याचे मनोहारी दृश्य अनुभवत आनंद व्यक्त केला.
नापणेचा धबधबा आता केवळ निसर्गप्रेमींना नव्हे तर साहसी पर्यटनप्रेमींसाठीही आकर्षणाचे केंद्र बनणार आहे. या पुलामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन नकाशावर एक नवीन तेजस्वी ठिपका उमटला आहे, आणि राज्यात पर्यटन विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.

आणखी वाचा