प्रा. सौ. मानसी चव्हाण यांना ‘कोकण दीप राज्यस्तरीय शिक्षणरत्न’ पुरस्कार

रत्नागिरी, दि. ३० : शिक्षण, साहित्य, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत प्रा. सौ. मानसी मंगेश चव्हाण यांना २०२५ चा ‘कोकण दीप राज्यस्तरीय शिक्षणरत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई, दादर येथील प्रा. सुरेंद्र गावस्कर सभागृहात पार पडलेल्या एका भव्य समारंभात राज्यमंत्री मा. योगेशदादा कदम यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला.
प्रा. चव्हाण या पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर कला, कै. सौ. विजयालक्ष्मी (गोदूताई) गांधी वाणिज्य आणि श्रीमान रमेशजी कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी येथे गेली १५ वर्षे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकुशलतेने आणि विद्यार्थ्यांशी आत्मीयतेने वागण्याच्या वृत्तीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.
त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच ते पारितोषिकप्राप्त विद्यार्थी राहिल्या असून, शिक्षकी पेशात पदार्पण केल्यापासून विविध राज्यस्तरीय निबंध, लेख, काव्य, वक्तृत्व, वादविवाद, हस्ताक्षर, कथाकथन, प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये त्यांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी अनेक यश संपादन केले आहे.
त्यांना मिळालेल्या प्रमुख पारितोषिकांमध्ये –
कै. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निबंध स्पर्धा – प्रथम पारितोषिक
कै. प्र. के. अत्रे वैचारिक लेख स्पर्धा – द्वितीय पारितोषिक
लांजा महाविद्यालय काव्य लेखन – प्रथम पारितोषिक
रत्नागिरी नगरपरिषद निबंध स्पर्धा – अनेक वर्षे प्रथम क्रमांक
त्यांचे ३५० हून अधिक प्रमाणपत्रांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर साहित्य विषयक प्रबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांनी जिल्हास्तरीय शिक्षक प्रशिक्षणांतही सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांची अनेक शैक्षणिक तासिका यूट्यूबवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.
२०१७ चा ‘पर्यावरण मित्र पुरस्कार’, २०२३ चा ‘कर्तबगार महिला पुरस्कार’, २०२४ चा ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती पुरस्कार’, आणि भूकंपग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीबाबत ‘सामाजिक कार्यकर्ती’ म्हणून सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे.
प्रा. चव्हाण यांनी एम.ए. (मराठी, हिंदी, इतिहास, अर्थशास्त्र), एम.एड (विशेष प्राविण्य), डीएसएम, सेट (मराठी), एम.फिल, एलएल.बी (२०२५) अशा अनेक पदव्या प्राप्त केल्या आहेत. २०२२ मध्ये मराठी विषयात कोल्हापूर बोर्डात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण करणाऱ्या, अभ्यासाला प्रेरणा देणाऱ्या आणि समाजमन घडवणाऱ्या प्रा. मानसी चव्हाण या खर्‍या अर्थाने ‘शिक्षणरत्न’ ठरल्या आहेत. त्यांच्या कार्यास रत्नागिरीतील शैक्षणिक क्षेत्रात तसेच समाजात मानाचा मुजरा व सलाम केला जात आहे.

आणखी वाचा