क्षत्रिय मराठा प्रिमियर चषक क्रिकेट स्पर्धा रंगली; शिवभक्त मराठा व तोरणा टायटन्स विजेते

रत्नागिरी, ता. २३ : क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या “क्षत्रिय मराठा प्रिमियर लीग” क्रिकेट स्पर्धेला खेळाडू व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत झाडगाव येथील शिवभक्त मराठा संघाने विजेतेपद पटकावले, तर साईनगरच्या मराठा वॉरियर्स संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या गटात तोरणा टायटन्स संघ विजेता ठरला, तर रायगड रायडर्स संघाने उपविजेतेपद मिळवले.

शांतीनगर येथील शिवरुद्र टर्फ मैदानावर दोन दिवस रंगलेल्या या स्पर्धेतील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. शिवभक्त मराठा संघाने ४ षटकांत ५२ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरादाखल मराठा वॉरियर्स संघाने झुंज दिली, मात्र त्यांना २८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही गौरवण्यात आले. ओंकार घाडी याने ७ सामन्यांत १५१ धावा करत उत्कृष्ट फलंदाजाचा किताब पटकावला, तर वेदांग मोरे (१० बळी) उत्कृष्ट गोलंदाज ठरला. शैलेश सावंत याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा सन्मान मिळाला. मालिकावीर पुरस्कारही ओंकार घाडी यालाच मिळाला असून त्याला इलेक्ट्रिक बाईक बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आली. विजेत्या पुरुष संघाला २५ हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला १५ हजार रुपये आणि चषक देण्यात आला.

महिलांच्या स्पर्धेत नंदिता सावंत हिने उत्कृष्ट फलंदाज, उत्तरा दळवी हिने उत्कृष्ट गोलंदाज, तर रश्मी घाग हिने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा मान मिळवला. मालिकावीर म्हणून नंदिता सावंत हिला १५ हजार रुपयांची पैठणी देऊन गौरविण्यात आले. महिला विजेत्या संघाला ७७७७ रुपये, तर उपविजेत्या संघाला ५५५५ रुपये आणि चषक प्रदान करण्यात आला.

या स्पर्धेत पंच म्हणून भाऊ तोडणकर, पर्णिकेश सुर्वे व अमेय बारगोडे यांनी काम पाहिले. समालोचक चिन्मय साखरकर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. नाचणे, मिऱ्या, शिरगाव, टेंभ्ये, कसोप, कोळंबे, फणसोप, पाली, खेडशी, टिके, कासारवेली आदी गावांसह शहरी भागातील एकूण २४ पुरुष संघ आणि ४ महिला संघ असे २८ संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.

विजेत्यांचा सत्कार नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे, नगरसेविका सौ. पूजा पवार तसेच मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे म्हणाल्या की, “अशा स्पर्धांमुळे मराठा समाजातील तरुणांना आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळते. समाजाची जिद्द, शिस्त आणि एकता यामुळे भविष्यात अधिक गुणवंत खेळाडू घडतील. खेळाडूंनी अशा स्पर्धांमध्ये सहभागी होत समाजाचे नाव उज्ज्वल करावे.”

पहिल्याच वर्षी मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे ही स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्याची मागणी संघांकडून करण्यात आली. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी क्षत्रिय मराठा मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले असून अमित कदम यांनी सूत्रसंचालन केले.

आणखी वाचा