मोसमी पावसाची अरबी समुद्रात आगेकूच; कोकणासह राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता

मुंबई, दि. २३ : राज्यातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मोसमी पावसाने नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्राच्या काही भागांसह कोमोरिन परिसर, बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि अंदमान समुद्राच्या बहुतांश भागात पुढे वाटचाल केली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मोसमी पाऊस या प्रदेशातील उर्वरित भागांमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मोसमी पावसाच्या पुढील प्रगतीसाठी वातावरणीय परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे लवकरच केरळमार्गे देशात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. राज्यातही पूर्वमोसमी पावसाच्या हालचालींना वेग आला असून काही भागांत वादळी पावसाची नोंद होत आहे.

राज्यात सध्या एकीकडे विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम आहे, तर दुसरीकडे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच कोल्हापूर, सातारा आणि पुणे घाट विभागांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, सांगली, सोलापूर, लातूर, नाशिक आणि अन्य काही भागांत हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम असून नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवारी ब्रह्मपुरी येथे राज्यातील सर्वाधिक ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूरमध्ये ४६.२, वर्धा ४५.५, अमरावती ४५.४ आणि नागपूरमध्ये ४५ अंश तापमान नोंदवले गेले.

रविवारी अकोला, वर्धा आणि अमरावती येथे उष्णतेचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूरला ‘ऑरेंज अलर्ट’, तर गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली येथे ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले की, विदर्भात सध्या आर्द्रतेचे प्रमाण कमी असून आकाश निरभ्र आहे. त्यामुळे सूर्यकिरणांची तीव्रता वाढून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

मोसमी पावसाची वाटचाल वेगाने सुरू असल्याने राज्यातील नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या अधिकृत आगमनाकडे लागले आहे. विशेषतः कोकणातील शेतकऱ्यांना या पावसाची प्रतीक्षा आहे.

आणखी वाचा