मुंबई, दि. ७ (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील शाळांमध्ये त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी भाषा सक्तीने लागू करण्याच्या निर्णयाविरोधात मराठी अभ्यास केंद्राच्या नेतृत्वाखाली गुरुवारी आझाद मैदान येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्य शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला.
शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीने आयोजित या आंदोलनाचे नेतृत्व मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार यांनी केले. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मितेच्या रक्षणासाठी विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर या आंदोलनात सहभागी झाले होते.
या आंदोलनाला मुंबई मराठी पत्रकार संघाचा ठाम पाठिंबा लाभला. संघाचे अध्यक्ष म्हणून मी स्वतः आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. यावेळी पत्रकार संघाचे माजी विश्वस्त प्रकाश कुलकर्णी, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, तसेच सदस्य किरण नाईक, हेमंत सामंत आणि राजेश माळकर यांचीही उपस्थिती होती.
“मराठी भाषेच्या अस्मितेच्या लढ्यात मुंबई मराठी पत्रकार संघ नेहमीच ठामपणे उभा राहिला आहे आणि राहील,” असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.