भाषा हे वादाचे नव्हे तर संवादाचे माध्यम– आशिष शेलार / मुंबई मराठी पत्रकार संघात भाषिक पत्रकारितेचा जागर

मुंबई, दि. १६ : “भाषा ही वाद निर्माण करण्यासाठी नसून संवाद घडवण्यासाठी आहे. विविध भाषांचा परस्पर आदान–प्रदान संस्कृतीला समृद्ध करतो. हिंदी पत्रकारितेच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त मराठी–हिंदी संपादक व पत्रकार यांची राष्ट्रीय परिषद आयोजित करणे हे संवाद दृढ करण्याच्या दिशेने टाकलेले स्तुत्य पाऊल आहे,” अशा शब्दांत राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गौरवोद्गार काढले.
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि काशी–वाराणसी विरासत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी पत्रकारिता द्विशताब्दी साहित्य व मीडिया महोत्सवाचे दोन दिवसीय आयोजन मुंबईतील आझाद मैदान येथील पत्रकार भवनात करण्यात आले. देशभरातील १७ राज्यांमधून संपादक, लेखक, अभ्यासक आणि पत्रकारांनी मोठ्या संख्येने या महोत्सवात सहभाग नोंदवला. महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमी, केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि उत्तर प्रदेश शासनाचे सहकार्य या सोहळ्याला लाभले.
हिंदीतील पहिले वृत्तपत्र ‘उदन्त मार्तण्ड’ याच्या प्रकाशनाला यंदा २०० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने हिंदी पत्रकारितेला घडवणाऱ्या वरिष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, कमलेश सुतार, रेखा देशपांडे, विश्वास देवकर आणि शरद वैद्य (मरणोत्तर) यांना सन्मानित करण्यात आले. शरद वैद्य यांचा पुरस्कार त्यांचे सुपुत्र अजय वैद्य यांनी स्वीकारला.
यावेळी मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी कोकणातील सुपुत्र आणि हिंदी पत्रकारितेतील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व पत्रकार महर्षी कै. बाबूराव पराडकर यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गातील पराड येथे स्मारक उभारण्याची विनंती मंत्री शेलार यांना केली. *‘राष्ट्रपती’*सह अनेक शब्द हिंदी भाषेला पराडकरांनी दिले असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
महोत्सवाचे उद्घाटन आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे केले. भाषेच्या माध्यमातून देशभरातील पत्रकार एकत्र येऊन विचारांचे आदानप्रदान करत आहेत, याचे कौतुक करत त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
काशी विरासत फाऊंडेशनचे राममोहन पाठक यांनीही या उपक्रमामुळे मराठी–हिंदी पत्रकारिता, भाषा–संवाद आणि राष्ट्रीय पत्रकारिता यांच्यात नवा वैचारिक दुवा निर्माण होत असल्याचा विश्वास व्यक्त केला.
दोन दिवसीय महोत्सवात ‘भारत : साहित्य आणि मीडिया महोत्सव’ अंतर्गत विविध चर्चासत्रे झाली. या सत्रांत प्राध्यापक सोमा बन्द्योपाध्याय, इस्कॉनचे प्रमुख ट्रस्टी प्रभु सूरदासजी, राम मोहन पाठक, केंद्रीय हिंदी निदेशालयाचे निदेशक हितेंद्र मिश्र, सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार तसेच मुंबई मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या संपूर्ण सोहळ्याद्वारे भाषिक पत्रकारितेचा सन्मान, संवादाचा विस्तार आणि राष्ट्रीय पातळीवरील पत्रकारितेतील ऐतिहासिक परंपरेची उजळणी झाली.

आणखी वाचा