शेतकरी आत्महत्या भूषणावह नाही; अधिवेशनातच सरसकट कर्जमाफी करा – नाना पटोले

मुंबई, दि. ५ (प्रतिनिधी) – “महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, पण आज त्याच महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत, ही बाब राज्यासाठी भूषणावह नाही,” अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत बोलताना केली. राज्यातील शेतकरी, तरुण, बेरोजगार, कामगार आत्महत्या करत आहेत, निरपराध नागरिकांवर पोलिस कारवाई केली जात आहे आणि सरकार या साऱ्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली.
ते म्हणाले की, गेल्या वर्षीच्या पावसाळी हंगामाचे नुकसान भरपाईचे पैसे अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. DBT च्या माध्यमातून पैसे देण्यात आल्याचा गवगवा झाला, पण प्रत्यक्षात शेतकरी अजूनही भरपाईपासून वंचित आहेत. केंद्र सरकारने धान्य खरेदीसाठी योजना आणली; मात्र विक्रीनंतर शेतकऱ्यांना पैसे देण्यात आलेले नाहीत. धान विकूनही सरकार त्याचे पैसे देत नाही आणि बँक शेतकऱ्यांकडून व्याज आकारत आहे. या परिस्थितीत शेतकऱ्याला कर्जदेखील मिळत नाही आणि त्याला सावकाराकडे वळावे लागते.
लातूर जिल्ह्यात एका शेतकऱ्याने स्वतःला औताला जुंपून घेतले आणि त्याची पत्नी त्याला हाकत होती. ही घटना महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे. शेतकऱ्याने स्वतःला औताला जुंपावे, आणि मग सरकारने त्याची दखल घ्यावी, मदत द्यावी, बैलजोडी द्यावी, ही खंतजनक गोष्ट आहे. गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांचे बैल गोरक्षणाच्या नावाखाली जप्त करून तथाकथित गोरक्षकांच्या हवाली करण्यात आले आणि नंतर विकून टाकण्यात आले. यावर सरकार गप्प का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पटोले म्हणाले की, राज्य सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. केंद्रावर विकलेले धान अद्याप तसंच पडून आहे. कृषी विभागाने मान्यता दिलेली नाही. धान खरेदी केंद्रांवर दलाल बसवून सरकारने शेतकऱ्यांना दुय्यम ठरवले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले होते, पण उद्योगपतींच्या दबावामुळे बैठकच रद्द करण्यात आली. गडचिरोलीमधील धान घोटाळ्यावर चौकशी करा, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले असून, सरकारने मागील वर्षाचे पैसे दिलेले नाहीत. यावर्षीही सततच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. परंतु तहसीलदारांकडून पंचनामे वेळेवर होत नाहीत. शासनाच्या योजना केवळ कागदावरच राहतात. दुधाला मिळणारा भाव अत्यंत कमी आहे, जनावरांचे खाद्य महाग झाले आहे. त्यामुळे दूध उत्पादक संकटात आहेत.
शेतकऱ्यांनी लाखोंचा खर्च केला, तरी सरकारकडून केवळ ६ हजारांची मदत मिळते आणि बाकी सर्व गोष्टींवर १८ टक्के GST लावले जाते. सरकार तुटपुंजी मदत करून मोठा दावा करत आहे. हे सरकार शेतकऱ्यांना लुटत आहे आणि मूठभर लोकांना सर्व लाभ देत आहे.
पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार असताना पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी देण्यात आली होती. आता मात्र फक्त कमिटी नेमली जाते. उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ होते, टेंडर मिळतात, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वेळकाढूपणा केला जातो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील, तर या अधिवेशनातच सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा सरकारच्या जुमलेबाजीला शेतकरी माफ करणार नाही.
राज्यात ३४,७६० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ८२,९९९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. परंतु सरकारकडून केवळ १०० कोटींची मदत जाहीर केली गेली आहे, जी हजारो कोटींच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर तुटपुंजी आहे. निसर्गही शेतकऱ्यांच्या बाजूने नाही, आणि सरकारही नाही, हीच आजची दुर्दैवी स्थिती असून, याच कारणाने शेतकरी आत्महत्या करत असल्याचे पटोले यांनी सांगितले.

आणखी वाचा