कोकणातील विद्यार्थ्यांनी गॅलरीतून अनुभवले थेट विधिमंडळाचे कामकाज

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

दापोली, दि. २३ (प्रतिनिधी): दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांना मुंबईतील विधानभवनात प्रत्यक्ष विधिमंडळाचे कामकाज पाहण्याची अनोखी संधी मिळाली. जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “व्हिजन दापोली” उपक्रमांतर्गत दोन दिवसीय “मुंबई अभ्यास दौरा” आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

या शैक्षणिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विधानसभा व विधानपरिषदेच्या गॅलरीतून प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव घेतला. सभागृहातील चर्चा, प्रश्नोत्तरांचा तास, तसेच निर्णय प्रक्रियेचे बारकावे विद्यार्थ्यांनी जवळून पाहिले. त्यामुळे पुस्तकातील सैद्धांतिक ज्ञानासोबतच लोकशाही व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना घेता आला.

या प्रसंगी विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे आमदार तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली. यावेळी कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत विधिमंडळाची रचना, कामकाजाची पद्धत, तसेच कायदे निर्मितीची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारत या प्रक्रियेबद्दल आपली उत्सुकता व्यक्त केली. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि जिज्ञासा पाहून कदम यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

लोकशाही व्यवस्थेचा केंद्रबिंदू असलेल्या विधिमंडळाचे कार्य प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर पडली आहे. अशा अभ्यास दौर्‍यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव अधिक दृढ होत असून भविष्यात जबाबदार आणि सजग नागरिक घडण्यास नक्कीच मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हा अभ्यास दौरा जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती दापोली यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला. शिक्षक व प्रशासनाच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना हा समृद्ध अनुभव मिळाला.

आणखी वाचा