रत्नागिरीत कापड व्यावसायिकाचे अपहरण; शहरात खळबळ

५३ वर्षीय सज्जन ओसवाल बेपत्ता; शहर पोलिसांकडून शोध सुरू

रत्नागिरी, दि. १० : रत्नागिरी शहरातील ५३ वर्षीय कापड व्यावसायिक सज्जन ऊर्फ पापा अमरचंद ओसवाल बेपत्ता झाल्याची आणि अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, रत्नागिरी शहर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सज्जन ओसवाल हे श्रीराम आळी येथील रहिवासी असून, त्यांचा अमरसन्स गारमेंट हा कापड व्यवसाय आहे. त्यांचे पुत्र रोहित सज्जन ओसवाल यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सज्जन ओसवाल हे आठवडा बाजार परिसरातील ‘यश ट्रेडर्स’ या दुकानातून त्यांचे पुतणे निर्मल रमेश ओसवाल यांना भेटण्यासाठी निघाले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. नातेवाइकांनी आणि कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला; परंतु ते आढळून न आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून सज्जन ऊर्फ पापा ओसवाल यांना बळजबरीने पळवून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या तक्रारीच्या आधारे ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ४४ मिनिटांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत असून, बेपत्ता व्यावसायिकाचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

आणखी वाचा