राजापूर, दि. ०३ (प्रतिनिधी) : राजापूर तालुक्यातील मिळंद–सावडाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच किर्ती योगेश आयरे यांची राज्यस्तरीय ‘आदर्श सरपंच सन्मान २०२६’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने दरवर्षी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सरपंचांचा गौरव केला जातो. यंदा आयरे यांच्या ग्रामविकासातील कामाची दखल घेत त्यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
ग्रामविकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, पारदर्शक प्रशासन आणि समाजहिताचे उपक्रम राबवून किर्ती आयरे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीत विविध सकारात्मक बदल घडून आले असून नागरिकांना त्याचा थेट लाभ झाला आहे.
‘आदर्श सरपंच सन्मान २०२६’ पुरस्कार सोहळा रविवार, ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास भाऊसाहेब वाकचौरे, भास्करराव पेरे पाटील, एकनाथराव ढाकणे तसेच रोहित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
किर्ती आयरे यांच्या कार्यकाळातील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी १०० टक्के वसूल करण्यात मिळालेले यश. फेब्रुवारी २०२१ मध्ये पदभार स्वीकारताना मोठ्या प्रमाणावर कर थकीत असताना, त्यांनी जनजागृती, नियोजनबद्ध पाठपुरावा आणि प्रशासनाच्या समन्वयातून सर्व थकबाकी वसूल केली.
या यशासाठी ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि सदस्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे आयरे यांनी नमूद केले. सामूहिक प्रयत्नांमुळेच हा सन्मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.








