संगमेश्वर, दि. २९ : संगमेश्वर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फणसवणे गुरववाडी येथे शाळा प्रवेशोत्सव आणि नवागतांचे स्वागत मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांसोबत प्रभातफेरी काढण्यात आली. “चला शाळेत जाऊया”, “सारे शिकूया, पुढे जाऊया”, “मुलगी शिकली, प्रगती झाली”, “अक्षर कळे संकट टळे” अशा विविध घोषणा देत विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला. शाळेच्या परिसरात रांगोळी, फुगे, पताका लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती.
कार्यक्रमात ग्रामस्थ श्री. प्रकाश घाणेकर, सरपंच श्रीमती उषा गुरव, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. जान्हवी गुरव, उपाध्यक्षा सौ. अश्विनी गुरव, माता पालक संघ अध्यक्ष सौ. दीक्षा सागवेकर, सर्व सदस्य, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली. यावेळी संगमरत्न फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना छत्र्यांचेही वाटप करण्यात आले. नवीन शालेय साहित्य, छत्र्या आणि स्वागतामुळे विद्यार्थी विशेष आनंदित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक यांनी पुढाकार घेतला. शाळेतील नवीन वर्षाच्या सुरुवातीला भरघोस सहभाग लाभल्याने एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले.