कोकणातून भविष्यात शास्त्रज्ञ, आयएएस-आयपीएस अधिकारी घडतील; विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे – पालकमंत्री उदय सामंत

 रत्नागिरी, दि. १९ : कोकणातील विद्यार्थ्यांमध्ये अफाट गुणवत्ता असून राज्यात कोकण विभागाचा निकाल सातत्याने अव्वल राहतो. भविष्यात याच कोकणातून शास्त्रज्ञ, आयएएस, आयपीएस अधिकारी घडून देशाच्या विकासात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. शिवसेना व युवासेनेच्या वतीने आयोजित दहावी-बारावी परीक्षेत ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. नाट्यगृहाची आसनक्षमता संपल्यानंतर अतिरिक्त खुर्च्यांची व्यवस्था करावी लागली. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी नोंदणीसाठी रांगा लावल्या होत्या.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामंत म्हणाले, “भविष्यात काय बनायचे आहे, याचे ध्येय आजच निश्चित करा. केवळ गुण मिळवणे पुरेसे नाही, तर आयुष्याची दिशा ठरवणे महत्त्वाचे आहे.” विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडविण्यासाठी विशेष मोबाईल ॲप विकसित करण्यात येत असून त्याद्वारे शासनाच्या विविध योजनांची माहितीही उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही आपण सदैव उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी त्या दिशेनेही विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात नीट परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात प्रथम आलेल्या रत्नागिरीच्या भावेश चव्हाण याचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पुढील शिक्षणासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

या सोहळ्याला नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, जिल्हा परिषद शिक्षण सभापती नंदा मुरकर, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, बंड्या साळवी, प्रीती सुर्वे, पूजा पवार, श्रद्धा हळदणकर, तुषार साळवी यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील ४२ शाळा, शहरी भागातील १२ शाळा तसेच सहा कनिष्ठ महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थ्यांनी या गुणगौरव सोहळ्यात सहभाग नोंदविला.

आणखी वाचा